वर्षभरात तिकिटांचा काळाबाजार; ५७ दलालांवर कारवाई
By सचिन देव | Published: April 5, 2023 09:08 PM2023-04-05T21:08:24+5:302023-04-05T21:08:53+5:30
बेपत्ता व घरातून पळालेल्या २०३ बालकांनाही पुन्हा केले पालकांच्या स्वाधीन
धुळे : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात जोरदार कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात भुसावळ विभागातील विविध स्टेशनवरून तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ५७ दलालांना अटक करून कडक कारवाई केली आहे. तसेच रेल्वेने घरातून पळालेल्या व बेपत्ता झालेल्या २०३ मुलांना ताब्यात घेऊन, त्याच्या पालकांच्या स्वाधीनही केले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाची महत्त्वाची भूमिका असून, भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक सुपरफास्ट गाड्यांना शस्त्रधारी रेल्वे सुरक्षा बलाची सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बहुतांश स्टेशनवर सीसीटीव्हीची यंत्रणा बसविण्यात आली असून, यामुळे गैरप्रकाराच्या घटना तत्काळ उघडकीस येण्यास मदत होत आहे. त्यानुसार भुसावळ भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने गेल्या वर्षभरात विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. गेल्या वर्षी धावत्या गाडीची साखळी ओढल्याप्रकरणी ८४७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
गाडीत विनापरवानी खाद्यपदार्थ विक्री करण्यास मनाई आहे. तरीदेखील विनापरवानगी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ८ हजार ७०३ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. रेल्वेगाडीतही महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडत असून, अशा प्रकारे छेडछाड करणाऱ्या ‘मेरी सहेली ऑपरेशन’अंतर्गत ८३ प्रवाशांवर कारवाई केली. तसेच रेल्वेची सिग्नल यंत्रणेची केबल चोरीप्रकरणी वर्षभरात ५२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही सर्व कारवाईची प्रक्रिया
डीआरएम एस. एस. केडिया, सीनिअर डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरे व रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त श्रीनिवास राव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याचे रेल्वे सुरक्षा बलातर्फे सांगण्यात आले.
...अन् १४ प्रवाशांचे वाचविले प्राण
अनेक प्रवासी धावती रेल्वेगाडी पकडणे किंवा धावत्या रेल्वेगाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न करतात. यामुळे संबंधित प्रवाशाचा जीव धोक्यात येत असून, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी अशा प्रकारे स्वत:च्या जिवाची बाजी लावून गेल्या वर्षी १४ प्रवाशांचे प्राण वाचविले. तसेच गाडीत चोरीला गेलेल्या १३३ प्रवाशांच्या सामानाचा शोध घेऊन, ते प्रवाशांना सुखरूप परत देण्यात आले.