अमरावती प्रकल्पात ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:25 PM2019-04-10T21:25:24+5:302019-04-10T21:26:01+5:30
मालपूर : भीषण पाणीटंचाईचे सावट, प्रकल्पाच्या पात्रात चार विहीरीचे खोदकाम फेल
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे आतापासूनच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अमरावती मध्यम प्रकल्प हा एकमेव गावाची तहान भागविण्याचा पर्याय असून तेथेही संपूर्णपणे पाण्याचा साठा संपला आहे. यामुळे पाणीटंचाई भीषण स्वरुप धारण करणार आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात जमिनीत झिरपलेले पाणी पोकलँड मशिनच्या सहाय्याने मोठा खड्डा करुन जलस्त्रोत वाढविण्याचा सध्या प्रयत्न दिसून येत आहे.
कधी नव्हे एवढे भीषण पाण्याचे संकट मालपूर गावावर घिरट्या घालत आहे. सुमारे २० हजार लोकवस्तीच्या गावाची तहान कशी भागवावी या विवंचनेत ग्रामपंचायत प्रशासन दिसून येत आहे. यासाठी वेळ न घालवता नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पदभार स्विकारण्याच्या आधीच येथील अमरावती मध्यम प्रकल्पात नवीन विहीरीचे खोदकाम युद्धपातळीवर सुरु केले. चार ठिकाणी आधुनिक पोकलँडच्या यंत्राच्या सहाय्याने भला मोठा खड्डा केला. मात्र, १५ ते २० फुटावर खडक लागल्याने अपयश आले. पाचव्या ठिकाणी प्रयत्नांना थोडेफार यश आले. मात्र, यावर आगामी पावसाळ्यापर्यंत गावाची तहान भागेल, याची शाश्वती नाही. याशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्यामुळे मालपूर गावावर पाण्याचे संकट गडद होतांना दिसत आहे. एवढ्या मोठ्या गावाला टँकरने पाणीपुरवठा करणेही अशक्य असून या संकटाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी काय उपाययोजना करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.