झेंडा लावण्यावरून धुळ्यात दगडफेक, तोडफोड
By admin | Published: February 20, 2017 03:39 AM2017-02-20T03:39:48+5:302017-02-20T03:39:48+5:30
शहरातील साक्री रोडवर राजीव गांधी नगरात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत तणाव
धुळे : शहरातील साक्री रोडवर राजीव गांधी नगरात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. त्याचे रुपांतर दगडफेकीत होऊन तीन रिक्षांची तोडफोडही करण्यात आली. या वेळी काहींना मारहाणही करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दोघांना ताब्यात घेतले.
येथील आनंदा भोई दुपारी घराजवळ झेंडा लावत होते़ त्याला काही तरुणांनी विरोध केला. यावरून दोन गटांत वाद झाला. त्याचे रुपांतर दगडफेकीत झाले. त्यात घरासमोरील तीन रिक्षांचे काच फुटल्या. या वेळी जमावाने एक हातगाडी व एक दुचाकी उलटवून टाकली. तात्काळ तेथे मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला़ त्यांनी जमाव पांगविला आणि परिसरात संचलन केले. तसेच सर्च आॅपरेशन राबवून दोन संशयितांना ताब्यात घेतले. परिसरातील संप्तत महिलांनी दंगेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता़ घटनास्थळी पोलीस बंदोबस्त असून परिसरात शांतता आहे. (प्रतिनिधी)