धुळ्यात दोन गटातील वादात तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:17 PM2018-04-19T13:17:57+5:302018-04-19T13:41:41+5:30

आरोपींना पकडण्यासाठी पथक : डॉ़ आंबेडकर पुतळ्याजवळ रास्तारोको

The blood of the youth group in Dhule | धुळ्यात दोन गटातील वादात तरुणाचा खून

धुळ्यात दोन गटातील वादात तरुणाचा खून

Next
ठळक मुद्देदेवपुरातील नरसिंह बियरबार जवळ दोन गटात हाणामारीगंभीर जखमी तरुणाचा उपचादरम्यान मृत्यू आरोपींना पकडण्याची मागणी कायम, रास्तारोको आंदोलन, पोलिसांचा बंदोबस्त 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपुरातील जयहिंद महाविद्यालय चौकातील नरसिंह बिअरबार परिसरात बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन गटात झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले़ यावेळी धारदार शस्त्राने वार झाल्याने चौघांना गंभीर दुखापत झाली़ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथेही पुन्हा हाणामारीचे पडसाद उमटले़ उपचार घेताना सनी उर्फ प्रशांत प्रकाश साळवे (१६) या तरुणाचा मृत्यू झाला़ आरोपींना पकडण्याची मागणी करत घटनेनंतर गुरुवारी सकाळी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ 
दोन दिवसांपुर्वी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचे पडसाद बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जयहिंद महाविद्यालय चौकातील नरसिंह बिअरबार परिसरात उमटले़ दोन तरुणाचा गट आपापसात भिडल्याने हाणामारीत त्याचे पडसाद उमटले़ यावेळी सर्रासपणे चॉपर, गुप्ती, तलवार, लोखंडी पाईप, रॉड अशा धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला़ यात सागर राजेंद्र साळवे (२१), सनी उर्फ प्रशांत प्रकाश साळवे, सुमीत अनिल सुर्यवंशी, सौरभ वसंत साळवे (रा़ चंदननगर, देवपूर धुळे) यांना गंभीर दुखापत झाली़ त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले़ या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात धुडगूस घालण्यात आल्याचे सांगण्यात आले़ 
पोलिसात फिर्याद दाखल
घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ याप्रकरणी सागर राजेंद्र साळवे (रा़ चंदननगर, देवपूर) या तरुणाने फिर्याद दिली़ त्यानुसार, संशयित दादा भोई, गुड्ड्या फुलपगारे, जितू फुलपगारे, गणेश फुलपगारे, दीपक फुलपगारे, वैभव गवळे यांच्यासह १५ ते २० जणांनी धारदार शस्त्राने वार केला़ त्यांच्याविरुध्द गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, २९५, ४२७, ३२३, ५०४, ५०६ यासह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे घटनेचा तपास करीत आहेत़ 
रास्तारोको आंदोलन
गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे निधन झाल्यानंतर वातावरण अधिकच तणावपुर्ण झाले़ आरोपींना तातडीने अटक करा, तरुणाचे इनकॅमेरा शवविच्छेदन झाले पाहीजे अशा प्रमुख दोन मागण्या घेऊन शेकडो तरुण रस्त्यावर उतरले़ डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आणि परिसरात रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले़ 
पदाधिकारीही दाखल
घटनेची माहिती मिळताच डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाल्मिक दामोदर, एम़ जी़ धिवरे, एस़ यू़ तायडे, किरण जोंधळे, अ‍ॅड़ राहुल वाघ, अ‍ॅड़ विशाल साळवे, अ‍ॅड़ उमाकांत घोडराज यांच्यासह अन्य पदाधिकारी दाखल झाले आहेत़ 
मार्गावरील वाहतूक ठप्प
डॉ़ बाबासाहेब आंबडेकर पुतळ्याजवळील चौकात रास्तारोको केल्यामुळे या भागातील तिनही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती़ काही वेळ राज्य परिवहन महामंडळाच्या बस देखील अडविण्यात आल्या होत्या़ आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिल्यामुळे बस पुर्ववत मार्गस्थ करण्यात आल्या़ 
दुकाने झाली बंद
घटनेचे तीव्र पडसाद उमटत असल्यामुळे तातडीने बसस्थानक परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती़ त्यामुळे या भागात शुकशुकाट पसरला होता़ दुपारी उशिरापर्यंत तणाव मात्र कायम होता़ 
पाच पथक रवाना
घटनेनंतर उमटत असलेले पडसाद लक्षात घेता तातडीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली़ आरोपींच्या शोधासाठी पाच पथके पाठविण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी दिली़ 
पोलिसांचा बंदोबस्त
पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र सोनवणे, सचिन हिरे आणि विविध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी ठाण मांडून आहे़ तणावपुर्ण शांतता कायम आहे़ 

Web Title: The blood of the youth group in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.