भरधाव ट्रॅक्टरने उडवले, दुचाकीवरील पिता-पुत्र ठार
By देवेंद्र पाठक | Updated: July 2, 2024 18:06 IST2024-07-02T18:06:01+5:302024-07-02T18:06:13+5:30
धुळे तालुक्यातील अजनाळे शिवारातील घटना

भरधाव ट्रॅक्टरने उडवले, दुचाकीवरील पिता-पुत्र ठार
धुळे : भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. ही घटना रविवारी रोजी कुसुंबा-मालेगाव रोडवर धुळे तालुक्यातील अजनाळे शिवारात घडली.
मोहन दामू साळुंखे व त्यांचा मुलगा गणेश मोहन साळुंखे (दोघे रा. कुसुंबा ता. जि. धुळे, ह. मु. अजंग वडेल ता. मालेगाव) हे त्यांच्या एमएच ४१ बीसी ५७६१ या क्रमांकाच्या दुचाकीने ३० जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या जीजे १८ बीव्ही ६८८६ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे पिता-पुत्र गंभीर जखमी होऊन मरण पावले. अपघात घडताच ट्रॅक्टर चालक वाहनासह फरार झाला आहे. याप्रकरणी रोहिदास अर्जुन साळुंखे यांनी फरार ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तालुका पोलिसात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.