कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून मालपूरमध्ये ६२ हजाराचे कापसाचे बोगस बियाणे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 05:20 PM2023-05-20T17:20:36+5:302023-05-20T17:21:04+5:30
याप्रकरणी एकाविरोधात दोंडाईचा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र शर्मा
मालपूर :- कृषी विभागाचे भरारी पथकाने छापा टाकून शनिवारी दुपारी महाराष्ट्रात बंदी असलेले एच.टी.बी.टी कापसाचे ६२ हजाराचे बोगस बियाणे जप्त केले. याप्रकरणी एकाविरोधात दोंडाईचा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदखेडा पंचायत समितीचे बियाणे निरीक्षक अभय नथु कोर यांनी शनिवारी दुपारी ३ वाजता मिळालेल्या गुप्त माहितीवरुन येथील ग्राम पंचायत कार्यालयजवळील पंढरीनाथ सदाशिव भोई यांच्या घरावर धाड टाकली. घरात विना परवाना साठवून ठेवलेला एच.टी.बी.टी. कापसाचा ६२ हजार ४० रुपये किमंतीचा साठा जप्त करण्यात आला.
सदर बियाणे आपण का आणले या बाबत विचारणा केली असता त्यांनी स्वतच्या शेतात लागवडीसाठी आणल्याचे सांगितले. सदरची कारवाईच्या वेळी भरारी पथकाचे गुणवत्ता निरीक्षक नितेंद्र पानपाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज सिसोदे उपस्थित हाेते. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस स्टेशनला भोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.