धुळे जिल्हयातील दुर्गम भागात बोगस डॉक्टर झाले सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:07 PM2020-07-29T12:07:42+5:302020-07-29T12:08:10+5:30

पदवी नसतांनाही अनेकजण करतात उपचार, अनेकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता

Bogus doctors became active in remote areas of Dhule district | धुळे जिल्हयातील दुर्गम भागात बोगस डॉक्टर झाले सक्रीय

धुळे जिल्हयातील दुर्गम भागात बोगस डॉक्टर झाले सक्रीय

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे : शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात बोगस, बंगाली डॉक्टरांची संख्या वाढली आहे. काही बोगस डॉक्टर तर रुग्णांना तपासून त्यावर उपचार करीत असल्याने, या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
बोराडी परिसरात आदिवासी वाड्या-पाड्यांचा परिसर मोठा आहे. या वाड्या-पाड्यापर्यंत शासकीय आरोग्यसेवा पोहोचलेली नाही.परंतु बोगस डॉक्टर मात्र सहजरित्या पोहोचले आहेत. अत्यंत वाजवी शुल्क आकारून औषधोपचार होत असल्याने रुग्णांनाही ते आर्थिकदृष्ट्या परवडते. त्यामुळे रुग्णही नजिकचे प्राथमिक आरोग्य केंद्र वा खासगी डॉक्टरांकडे न जाता, या डॉक्टरांकडूनच उपचार करून घेणे पसंत करीत आहेत. दरम्यान दुर्गम भागात जे उपचार करीत आहेत, त्यांच्याकडे कुठलीही पदवी नाही.
तालुका समित्या कागदावर
बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, वा नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सदस्यत्वाखाली तालुकास्तरीय समिती असते. या समितीमार्फत आरोग्यसेवा देणाºयांची शहानिशा करणे, बोगस असल्यास कारवाई करणे अपेक्षित आहे.परंतु सदरची समिती ही कागदावरच असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे. आदिवासी भागासह ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टराचे जाळे पसरले आहे. यात बोराडी परिरातील सुळे,कोडीद,पणाखेड,भोईटी, सांगवी, पळासनेर, हाडाखेड, दहिवद, वकवाड, बोराडी,या भागात बोगस डॉक्टरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Bogus doctors became active in remote areas of Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे