दोघांना फाईटरने मारहाण, ३० हजारही लुटले; सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: August 18, 2023 05:46 PM2023-08-18T17:46:39+5:302023-08-18T17:46:50+5:30
वाढदिवसासाठी मंगल कार्यालय दिले नाही या कारणावरून तरुणासह दोघांशी वाद घालत त्यांना फाईटने मारहाण करण्यात आली.
धुळे: वाढदिवसासाठी मंगल कार्यालय दिले नाही या कारणावरून तरुणासह दोघांशी वाद घालत त्यांना फाईटने मारहाण करण्यात आली. तरुणाकडील ३० हजाराची राेकडही हिसकावली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात निजामपूर येथील म्हसाई माता पतसंस्थेचे व्यवस्थापक नीलेश रामदास जयस्वाल (रा. गांधी चौक, निजामपूर) यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, वाढदिवस साजरा करण्यासाठी मंगल कार्यालय मागण्यात आले होते.
परंतु मंगल कार्यालय दिले नाही. याचा राग मनात धरून साक्री तालुक्यातील निजामपूर आणि जैताणे येथील सहा जणांनी मिळून नीलेश जयस्वाल याला अडविले. त्याच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ करण्यात आली. वाद घालत असताना तो विकोपाला गेल्याने त्याला फाईटने मारहाण करण्यात आली. त्याला मारहाण होत असल्याचे लक्षात येताच लक्ष्मीकांत शाह (रा. निजामपूर, ता. साक्री) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यात दोघेही जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास म्हसाई माता पतसंस्थेत घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर सहा जण फरार झाले आहेत. पोलिस त्यांच्या मागावर आहेत.