संपूर्ण खान्देशात ‘बैलपोळा’ म्हणूनही पोळ्याची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 06:53 PM2019-08-30T18:53:52+5:302019-08-30T18:54:16+5:30
यंत्रयुगातही बैलांचे महत्त्व अबाधित : बळीराजाला सदैव साथ
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : राज्यात इतर प्रांतांसह पोळा खान्देशात साजरा केला जातो तो सण म्हणजे 'पोळा.' या सणाला खान्देशात ‘बैलपोळा’ही म्हणतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.
श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण राज्यात साजरा केला जातो तो सण म्हणजे 'पोळा.' खान्देशात बैलपोळा म्हणून त्यांची खास ओळख आहे.
शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो. शेतकºयाचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेत त्यांना आंघोळ घालतात. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तºहेने बैल सजविण्यात येते.
शेतकºयाच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्याची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर या लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजत गाजत जातात व त्याला 'अतिथी देवोभवो' प्रमाणे घरी आणतात.
घरातील सुवासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात.
पूर्वी शिंदखेडा तालुक्यात काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जायचा. मात्र यात बैल व शेतकरी जखमी होत असल्याने आता गावातून मारुतीच्या पाराला फेºया मारून घरी आणून त्यांची पूजा करण्यात येते. पूर्वी ज्या शेतकºयाचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकºयाच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जात होता. ही प्रथा कालांतराने बंद पडली. त्यांनतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण गावातून शेतकºयाचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.