गाळपसाठी एक लाख टन ऊस तोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:13 PM2019-02-28T22:13:47+5:302019-02-28T22:14:27+5:30
साक्री तालुका: २५ हजार टन अद्याप बाकी; ३१ मार्चपर्यंत संपूर्ण तोड होणार
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील ऊस गाळपासाठी शेजारील जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जात असल्याने यंदाच्या ऊस गाळप हंगामात आतापर्यंत १ लाख टन उसाचे गाळप झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अजून तालुक्यात २५ हजार टन ऊस गाळप बाकी असून ३१ मार्च अखेरपर्यंत सर्व ऊस तोडला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील ऊस हा नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पुरवला जात असल्याने तालुक्यातून १ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या महिन्यापासून ऊस तोड तालुक्यात सुरु असल्याने ३१ मार्चपर्यंत ऊस हा सर्व तोडून नेला जाणार आहे.
तालुक्यातील ऊस हा नाशिक जिल्ह्यातील जवळच असलेल्या द्वारकाधीश साखर कारखाना व विठेवाडी साखर कारखान्याला जात असतो. यात द्वारकाधीश साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस जात असून संपूर्ण हंगामात एकूण उसाच्या गाळपात तालुक्याचा २५ टक्के हिस्सा याच तालुक्याचा असतो, असे म्हणावे लागेल.
गेल्या तीन वर्षापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक वाया जात असल्याने व गेल्यावर्षभरापासून शेती मालाला योग्य भाव नसल्याने शेतकरी उसाकडे वळले आहेत. ऊस लागवडीत ठिबक सिंचन मोठ्या प्रमाणात होत आहे. ऊस लागवडीकडे बऱ्याप्रमाणात शेतकरी वळले आहेत.
तालुक्यातील मजूर हे गुजरात राज्यातील ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात जात असतात. अंदाजे १० हजार मजूर हे ऊस तोडणीसाठी जात असतात. ५ ते ६ महिने हे मजूर आपला पाडाव तेथे नेत असतात. कमी वेळात जास्त पैसे मिळत असल्यानेच हे मजूर ऊस तोडणीसाठी जात असतात.
तालुक्यातील पांझराकान साखर कारखाना हा बºयाच वर्षापासून बंद पडला असून तालुक्यातील राजकीय लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून तालुक्यातील युवकांना रोजगार मिळण्यास संधी निर्माण होईल.
कारखाना सुरू झाल्याने ऊसाचा गोडवा तालुक्यात दरवळेल हे निश्चित.