सुरत बायपास महामार्गावरील गोदामात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:31 AM2018-02-24T11:31:34+5:302018-02-24T11:41:08+5:30
दरमहा १० हजार खंडणीचीही मागणी : जिवे ठार मारण्याची धमकी, तणावपूर्ण स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरानजीक सुरत बायपास महामार्गावर असलेल्या बालाजी वेफर्सच्या गोदामात गुरुवारी रात्री दोघांनी धिंगाणा घातला़ शिवाय तोडफोड करत महिना १० हजारांची खंडणीही मागितली़ याप्रकरणी शुक्रवारी पहाटे शहर पोलिसात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला़
शहरानजिक सुरत बायपास महामार्गावर हे गोदाम आहे़ या गोदामात गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास दोन जण आले़ त्यांनी सुरुवातीला आरडाओरड करत दमबाजी करण्याचा प्रयत्न केला़ दहशत निर्माण करत दर महिन्याला १० हजार रुपये खंडणीची मागणी केली़ परंतु खंडणी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच त्यांच्याकडून तोडफोड करण्यात आली़ यात एमएच १८ एम ९१७५ यासह अजून एक टेम्पो अशा दोन वाहनांचे नुकसान करण्यात आले़ दरमहा १० हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली़ तोडफोड केल्यामुळे काही काळ या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती़
घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शुक्रवारी पहाटे प्रविण दत्तात्रय ब्राह्मणकर (रा़शिवशक्ती कॉलनी) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित समाधान आनंदा त्रिभुवने (रा़ लीलाबाई चाळ) आणि अन्य एक अशा दोन जणांविरुध्द भादंवि ३८४, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ पुढील तपास सुरू आहे़