ब्रिटिश सरकारच्या खजिना लुटीच्या घटनेला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 09:55 PM2019-08-09T21:55:39+5:302019-08-09T21:56:16+5:30
आगस्ट क्रांती दिन : स्वातंत्र्य सैनिकांच्या क्रांती लढ्याचा इतिहास अजरामर
रवींद्र राजपूत।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह चिमठाणे साळवे ही गावे स्वातंत्र्य लढयात खूप महत्वाची ठरली आहेत. क्रांती लढयाचा माध्यमातून सुवर्ण अक्षरात या क्रांतीकारकांचा इतिहास अजरामर झाला आहे.
पत्री सरकारच्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी १४ एप्रिल १९४४ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदविला गेला. क्रांतिकारकांना माहिती मिळाली होती की, जर पश्चिम खानदेशातील जिल्ह्यातील ब्रिटिश सरकारचा खजिना लुटला तर पत्री सरकारमधील हवे तेवढया संख्येत कार्यकर्ते पुरवण्यात येतील. त्यामुळे विष्णुभाऊ पाटील यांना हुरूप आला आणि त्यांनी धुळे जिल्हयातील खजिना लुटण्याचा बेत आखला आणि इतिहासात इंग्रज सरकारला हादरा देत क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिकांनी साडेपाच लाख रुपयाचा सरकारी खजिना लुटला हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा लढयात क्रांती दिवस म्हणून सुवर्ण अक्षरांनी लिहीला गेला. स्वातंत्र्यासाठी लढणाºया काँग्रेससाठी ही अभूतपूर्व घटना ठरली. या लुटीत जी.डी. लाड, नागनाथ नायकवाडी, किसन मास्तर, राम माळी, निवृत्ती कळके, डॉ.उत्तमराव पाटील, शंकरराव माळी, अप्पादाजी पाटील, रावसाहेब शेळके, व्यंकटराव धोबी यांचा प्रमुख सहभाग होता. १४ एप्रिल १९४४ च्या दोन आठवडयाआधी साताºयाहुन १६ बंदुकधारी क्रांतिकारक धुळ्यात आले. बोरकुंड येथे शेतात पंधरा दिवस त्यांनी मुक्काम केला या ठिकाणी दयाराम पाटील व भाऊराव पाटील हे इंग्रजांच्या हालचालींविषयी माहिती देत असत. त्यांना माहिती मिळाली की १४ एप्रिल रोजी इंग्रजांचा साडेपाच लाख रुपये एवढा सरकारी खजिना धुळ्याहून नंदुरबारकडे हलवण्यात येत आहे. तेव्हा क्रांतिकारकांनी १४ एप्रिलच्या सकाळी इंग्रजांचा खजिना घेऊन जाणारी गाडी क्रमांक यु.बी.वाय.पी. ४२२ प्रवासासाठी निघाली. गाडीत चालक शेजारी खजिनदार कारकून, मधल्या कप्प्यात खजिनाच्या पेटया व मागे सुरक्षेसाठी शस्त्रधारी जमादार बसलेले होते. क्रांतिकारक सैनिकांनी नियोजना प्रमाणे समूहाने धुळ्याकडून गाडीमागे पाठलाग करत चिमठाणे येथे आले. चिमठाण्यात पोलीस चौकी असल्याने तिथे खजिना न लुटता आज ज्या ठिकाणी क्रांतिस्मारक आहे तिथे लुटण्याची योजना आखली सगळ्यांनी एकत्र न येता गट करण्याचे ठरवत टोळ्या केल्या त्यानुसार दोन टोळ्या पिशवी घेऊन चिमठाण्यापुढे निघाल्या. दोन टोळ्या चिमठाण्यापासून काही अंतरावर हॉटेल असलेल्या ठिकाणी थांबले, रस्त्यावर पोलीस उभा होता, त्याच्याशी गप्पा मारत, त्याला चहा पाजला. गप्पामध्ये गुंतवत आम्ही दोंडाईचा जवळ असलेल्या मालपूर येथे लग्नासाठी जात असून एखाद्या गाडीत जागा मिळवून द्या म्हणून गळ घातली. गाडीत प्रवेश करण्यासाठी हा बनाव रचण्यात आला होता. त्यानुसार खजिना घेऊन जाणारी सरकारी गाडी सकाळी साडे दहाला तिथे आल्याबरोबर गाडीतील पोलिसाना हेच कारण देत जागा मिळवली. बरोबर चिमठाण्यापासून एक किलोमीटर अंतरावर आज स्मारक ज्या ठिकाणी आहे त्या ठीकाणी गाडी आल्यावर खोकला उलटीचे नाटक करत गाडीच्या खिडकीतून डोकावत लाल रुमाल दाखवून पुढे थांबलेल्या सहकारी क्रांतीकारकांना इशारा देण्यात आला. गाडी चढाव असलेल्या भागावर आल्यावर बाहेर थांबलेल्या क्रांतिकारकांनी भांडण करण्याचे नाटक करत गाडी पुढे आले. तेव्हा चालकाने ब्रेक दाबत गाडी थांबवल्यावर अवघ्या काही क्षणात गाडीत बसलेल्या क्रांतिकारकांनी झटापटीत पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. चालकाने गाडी सावरण्यासाठी पुढे नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. क्रांतिकारकानी गोळीबार करत पोलीस सयाजी भिवा व सदाशिव भास्कर दोघे जखमी झाल्यावर महात्मा गांधी की जय, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. त्यावेळी समोरून जाणार ट्रक थांबवण्यात आला. ट्रक चालकाने ओळखल की खजिना लुटणारे लुटारू नसून स्वातंत्र्य सैनिक आहेत. ट्रक चालकाने ट्रक खाली करत खजिना नेण्यासाठी सहकार्य केले. क्रांतिकारकांनी खजिनाच्या पेटया तोडल्या. धोतरमध्ये पाच लाख रुपयांचे गाठोडे केले. नोटांची सहा गाठोडी त्यावर हजारांची चिल्लर पसरवण्यात आली. मुद्देमाल ट्रकमध्ये भरण्यात आला. गाडीतील जखमी पोलीसाना रस्त्याच्या बाजूला झाडाखाली बांधून क्रांतिकारक लामकानी गावाकडे निघून गेले. शिंदखेडा पोलीस क्रांतिकारकांचा शोध घेत असताना रुदाणे गावाजवळ शेतात क्रांतिकारक व पोलिसांत चकमक होऊन गोळीबार देखील झाला. यात संध्याकाळी अंधार पडल्याच्या फायदा घेत क्रांतिकारक पसार झाले त्यानंतर सर्वांनी एकत्र न राहता सगळे विभागले गेले. लुटीतला खजाना महाराष्ट्रभर स्वातंत्र्य लढयासाठी क्रांतिकारकांना वाटण्यात आला. या खजिन्याची स्वातंत्र्य लढयात खुप मदत झाली. या खजिना लुटीसाठी शिंदखेडा तालुक्यातील शिवराम आबा, महिपत पाटील, दमयंतीबाई बाबुराव गुरव, व्यंकटराव धोबी, कापडण्याचे विष्णुभाऊ पाटील, जुनवण्याचे यशवंतराव, शहादयाचे सखाराम शिंपी, प्रकाशाचे नारोत्तमभाई, माणिक भिल, वडजाईचे फकिरा अप्पा, केशव वाणी, देऊरचे, मेनकाबाई नाना देवरे, रामदास पाटील, झुलाल भिलाजीराव पाटील, गोविंदभाई वामनराव पाटील अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी खजिना लुटीसाठी मदत केली. या पैकी व्यंकटराव धोबी, शंकर पांडू माळी, धोंडीराम तुकाराम माळी, कृष्णराव विष्णू पवार, अप्पाजी उर्फ रामचंद्र भाऊराव पाटील, विष्णू सीताराम, शिवाजी सीताराम सावंत, हे क्रांतिकारक पकडले गेले. दोन वर्ष खटला चालला, १८ फेब्रुवारी १९४६ ला व्यंकटराव धोबी, शंकर माळी, धोंडी राम माळी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. विष्णू पाटील, शिवाजी सावंत यांची निर्दोष सुटका झाली. खान्देशातील धुळे, नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांचे मोठे योगदान क्रांती दिनी आठवायला हवे.