एकीकडे घरफोडी, दुसरीकडे प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 06:41 PM2019-04-03T18:41:01+5:302019-04-03T18:41:47+5:30
चोरट्याच्या दगडफेकीत एक जखमी : देवपुरातील नागरीकांमध्ये भीती
धुळे : शहरातील देवपूर भागात चोरट्यांनी मंगळवारी पहाटे उच्छाद मांडला़ एका घरफोडीत चोरट्यांच्या हाती दीड लाखांचा ऐवज लागला़ दुसऱ्या घरफोडीत मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसला़ यात चोरट्यांनीच दगडफेक केल्याने घरात एकास दुखापत झाली़ या घटनेनंतर देवपुर भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़ दरम्यान, आरडाओरड झाल्याने चोरट्यांनी धूम ठोकली़
देवपुरातील जुन्या आग्रा रोडवर जीटीपी कॉलनीपासून जवळच असलेल्या गितांजली सोसायटीत आनंद दिवान पवार हे त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात़ खालच्या मजल्यावर सुनील बन्सीलाल भामरे हे भाडेकरु म्हणून राहतात़ ते एका कंपनीत नोकरीला आहेत़ कंपनीच्या कामांनिमित्त ते बारामती येथे गेले होते़ त्यामुळे घरात त्यांची पत्नी आणि मुलगी होती़ मुले आणि पत्नी बेडरुममध्ये झोपलेले असताना चोरट्यांनी सुनील भामरे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीची ग्रिल काढून घरात प्रवेश केला़ चोरट्यांनी घरातील २२ हजाराची रोकड, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केला़ सकाळी चोरीची ही माहिती मिळताच देवपूर पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले़ श्वानाने कुंभार गुरुजी शाळेपासून हायवेपर्यंतचा माग काढला़
चोरीची दुसरी घटना जीटीपी कॉलनीत घडली़ प्लॉट नंबर २५ अ येथे माणिक बोरसे हे ट्रक व्यावसायिक राहतात़ त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या रुममध्ये प्रफुल्ल अशोक पाटील (४५) हे भाडेकरी म्हणून राहतात़ मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता प्रफुल्ल पाटील यांच्या घराच्या मागील खिडकीचा गज वाकवून चोरट्यांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला़ मात्र, खिडकीचा गज वाकविताना आवाज आल्याने पाटील हे झोपेतून जागे झाले़ त्यांनी लाईट लावून चोरट्यांवर प्रकाशझोत टाकला़ परिणामी पाटील यांच्यावर चोरट्यांनी दगडफेक केली़ यात पाटील यांना दुखापत झाली आहे़ पाटील यांनी केलेल्या आरडाओरडमुळे चोरट्यांनी धूम ठोकली़ यावेळी चोरट्यांनी घाबरुन त्यांच्या दारापुढे चोरलेले दीड ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि चाव्यांचा गुच्छ तेथेच सोडून चोरटे पळून गेले़ बहुधा हे दागिने गितांजली कॉलनीतील घरफोडीचे असावेत असा अंदाज आहे़
दरम्यान, या घटनेनंतर देवपुरातील कॉलनी भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ घटनेची नोंद देवपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़ चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरु झाले आहे़