पिंप्राळ येथे दोन ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 11:54 AM2019-04-05T11:54:04+5:302019-04-05T11:55:09+5:30
४४ हजाराचा ऐवज लंपास : अज्ञातांविरूद्ध गुन्हा
आॅनलाइन लोकमत
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील पिंप्राळ येथे चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना २ रोजी रात्री ९.३० ते ३ एप्रिल रोजीच्या पहाटे ३.३० दरम्यान घडली. याप्रकरणी नरडाणा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंप्राळ येथील सुयोगनगरातील रहिवाशी रामदास शंकर सूर्यवंशी व भगवान आधार पाटील यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील ४३ हजार रूपये किंमतीचे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने, १० भार चांदी व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. चोरी करणारे दोघे चोरटे २५ वयोगटातील होते. त्यांनी काळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेले होते.
याप्रकरणी रामदास सर्यवंशी यांनी नरडाणा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.
या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.