साक्री तालुक्यातील भांडणे येथे घरफोडी, ४० हजाराचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:09 PM2018-05-07T16:09:42+5:302018-05-07T16:09:42+5:30
अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल, चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
आॅनलाइन लोकमत
धुळे : साक्री शहरासह परिसरात चोरीचे सत्र सुरूच असून, तालुक्यातील भांडणे येथील व्यापाºयाकडे चोरट्यांनी घरफोडी करून, ४० हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केले आहे. ही घटना ५ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
भांडणे येथील नवकार नगरात प्लॉट नं. २९ मध्ये राहणारे धनंजय प्रभाकर अहिराव (३५) हे घराला कुलूप लावून माळदार गावी गेले होते. ही संधी साधत चोरट्याने ५ रोजी रात्री ८ ते ६ रोजीच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ३० हजार रूपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्याची माळ, ७ हजार रूपये किंमतीचे कानातले. ३ हजार रूपयाचे सोन्याचे पान व अंगठी असा एकूण ४० हजार रूपयाचे दागिने लंपास केले. या प्रकरणी धनंजय अहिराव यांनी साक्री पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जी.व्ही. झाल्टे करीत आहेत.
चोरांचा बंदोबस्त करावा
साक्री तालुक्यात चोरांनी उच्छाद मांडलेला आहे. एक-दोन दिवसाआड कुठेनाकुठे घरफोडी होत असल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. महिन्याभरात अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडलेल्या असून, चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. पोलिसांनी या चोरांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.