देवपुरातील आरती सोसायटीत घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:01 PM2020-04-13T22:01:55+5:302020-04-13T22:02:21+5:30
३६ हजाराचा ऐवज : पोलीस ठाण्यात गुन्हा
धुळे : देवपुरातील आरती सोसायटीत बंद घराचा फायदा घेत शनिवारी पहाटे घरफोडी करत ३६ हजाराचा ऐवज लांबविला़ यात सोन्याचे दागिन्यांसह गॅस सिलेंडर, शेगडीचा समावेश आहे़ घरफोडीच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे़
भालेराव नगर अमळनेर येथे राहणाऱ्या रिता भुपेंद्र बाविस्कर या महिलेने देवपुर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, रिता बाविस्कर हिची आई आणि भाऊ यांचे धुळ्यातील देवपूर भागात आरती सोसायटी प्लॉट नंबर ७९ येथे वास्तव्य आहे़ ते बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते़ बंद घराचा फायदा चोरट्याने उचलला़ त्यांच्या घराच्या मागील दरवाजाचे स्कू्र काढून घेतले़ त्यानंतर दार अगदी सहज उघडून आतमध्ये प्रवेश केला़ संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत किचनजवळील लाकडी दरवाजाही तोडला़ चोरट्याने एचपी कंपनीचे दोन सिलेंडर व एक गॅस शेगडीसह एक तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि १३ हजार ७०० रुपये रोख असा एकूण ३६ हजार २०० रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला़
घरफोडीची ही घटना शुक्रवार १० एप्रिल रोजी रात्री १० वाजेपासून ते शनिवार ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली़ आई आणि भाऊ घरी आल्यानंतर आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ याप्रकरणी देवपूर पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली़ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली़ याप्रकरणी रविवार १२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीस हेड कॉन्स्टेबल ए़ बी़ चिंचोलीकर घटनेचा तपास करीत आहेत़