बस कंटेनर अपघात जिवीतहानी टळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:12 PM2018-01-12T12:12:45+5:302018-01-12T12:13:29+5:30
मुकटी शिवार : कंटेनर सोडून चालक फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दुचाकीला ओव्हरटेक करीत असताना भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने परिवहन महामंडळाच्या बसला मागून धडक दिली़ या अपघातात बसचा पत्रा कापला गेला़ सुदैवाने यात जिवीतहानी टळली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता कंटेनर सोडून चालक पळून गेला़ ही घटना धुळे तालुक्यातील मुकटी शिवारात गुरुवारी घडली़ तालुका पोलिसात नोंद करण्यात आली़
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर धुळे तालुक्यातील मुकटी गावाच्या शिवारात पवार वर्कशॉप समोर अपघाताची ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली़ एमएच ४ क्यू ६२०७ क्रमांकाची परिवहन महामंडळाची बस प्रवाश्यांना घेवून धुळ्याकडून जळगावकडे जात होती़ तर एमएच ४ एफयू ४९८७ क्रमांकाचा कंटेनर हा जळगावकडून धुळ्याकडे येत होता़ कंटेनरच्या पुढे दुचाकी जात होती़ या दुचाकीला ओव्हरटेक करत असताना बसच्या चालकाच्या मागील बाजूला कंटेनरने धडक दिली़ बसच्या सहा आसनी खिडकीजवळ गाडीचा नंबर लिहिलेल्या ठिकाणी पत्रा कापला गेल्याने नुकसान झाले़ या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही़ बस आणि कंटेनरचे नुकसान मात्र यात झाले आहे़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता कंटेनर चालक पळून गेला आहे़
याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात बसचालक अतिशसिंग भागवतसिंग परदेशी (३५) यांनी गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार भादंवि कलम २७९, ४२७ आणि मोटार वाहन कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आऱ सी़ वाघ करीत आहेत़