साक्री येथे बसचालकाला धक्काबुक्की
By admin | Published: April 15, 2017 03:04 PM2017-04-15T15:04:07+5:302017-04-15T15:04:07+5:30
चालकांचे एस. टी. बंद आंदोलन : दोन तासानंतर आंदोलन मागे
Next
साक्री,दि.15 - साक्री बस आगारात जळगाव डेपोची बस (क्रमांक एम. एच. 20 सीएल 3196) दुपारी साडे बारा वाजता प्रवेश करत असताना एका दुचाकीस्वारला बसचा कट लागल्याची घटना घडली. त्यानंतर दुचाकीस्वाराने बसचालकाला धक्काबुक्की करत चालकाशी हुज्जत घातली. त्यामुळे संतप्त झालेल्या साक्री आगारातील एस. टी. बस चालक व वाहकांनी एस. टी. बंद आंदोलन पुकारले. हे प्रकरण सामंजस्याने मिटल्यानंतर दुपारी अडीच वाजेपासून बस वाहतूक सुरळीत सुरू झाली.
जळगावहून वापीकडे जाणारी बस श्रीकृष्ण भागवत पाटील हे घेऊन जात होते. साक्री येथे दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास चालक श्रीकृष्ण पाटील त्यांनी बस आगारात प्रवेश केला. त्यावेळी एका दुचाकीला कट लागल्याने संबंधित दुचाकीस्वाराने भांडण केले. चालक श्रीकृष्ण पाटील यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे साक्री आगारातील संतप्त वाहक व चालकांनी एस. टी. बंद आंदोलन केले.
प्रवाशांचे हाल
चालक व वाहकांनी एस.टी.बंद आंदोलन तब्बल दोन तास सुरू होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. भर उन्हात बसस्थानकात प्रवाशांना थांबून रहावे लागल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
बैठकीत निघाला तोडगा
घटनेचे वृत्त कळताच शिवसेनेचे शहर प्रमुख पंकज मराठे व साक्री पोलीस स्टेशनचे निरीक्षक अभिषेक पाटील यांनी चालक व वाहकांची बैठक घेतली. बैठकीत सामंजस्याने तोडगा निघातल्यामुळे चालक व वाहकांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले.