स्थलांतरीत विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 09:30 PM2018-12-11T21:30:41+5:302018-12-11T21:31:12+5:30

मोहीमेसाठी स्वखर्च : मुख्याध्यापक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीने घेतलेला निर्णय

Campaign to bring migrant students to school | स्थलांतरीत विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी मोहीम

स्थलांतरीत विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी मोहीम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जैताणे : स्थलांतरित  विद्यार्थ्यांना गोवर व रूबेला लसीकरणासाठी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी शाळेचे मुख्याध्यापक व गावातील सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी सोमवारी महत्वाचा निर्णय घेऊन स्वत: स्वखर्चाने स्थलांतरीत झालेल्या आदिवासी गरीब कुटूंबातील  विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आज सकाळी मध्यप्रदेश राज्यातील काही भागात  गाडी घेऊन त्यांना शाळेत आणण्यासाठी रवाना झाले.
माळमाथा परिसरात यंदा भीषण दुष्काळ असल्यामुळे ऊसतोड हाच एक पर्याय उपलब्ध झाला म्हणून यावर्षी बरेच आदिवासी कुटुंब मध्यप्रदेश खेतिया या भागात पोटाची खळगी भरण्यासाठी गेले होते. पण शाळेतील  काही गरीब कुटुंबातील विद्यार्थी स्थलांतरीत झाल्याचे पाहून शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बच्छाव यांना ही गोष्ट स्वस्थ बसू देत नव्हती.
७ डिसेंबर रोजी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बच्छाव, सरपंच प्रतिनिधी नारायण सावळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष सावळे, सुकदेव शेलार, प्रभाकर वाघ  व  शाळा व्यवस्थापन सदस्य राजू भिल यांना सोबत घेऊन मध्यप्रदेश राज्यातील मेलन  येथील दुर्गा शुगर फॅक्टरी गाठली.  तेथील पालकांची परवानगी घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेतले व गोवर रुबेला लसीकरणासाठी तसेच शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. जोपर्यंत या विद्यार्थ्यांसाठी शासन काही उपाययोजना करत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी शाळा प्रशासनाने घेतली आहे. यावेळी सरपंच प्रतिनिधी नारायण सावळे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष सावळे यांनी प्रभाकर वाघ, राजू भिल  यांनी  स्थलांतरित २५ विद्यार्थ्यांना सोबत घेत उभरांडी गाठले.
स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी शासनाने काहीच उपाययोजना केल्या  नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला व जर का उपाययोजना केल्या असतील तर  त्यांची प्रभावी अंमलबजावणी का करण्यात येत नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थ व पालकांनी शासनाला विचारला आहे.
त्याच बरोबर विद्यार्थ्यांप्रती शिक्षणाची काळजी असणारे मुख्याध्यापक शाळेला व गावाला लाभले याबाबत समाधान व्यक्त    केले.

Web Title: Campaign to bring migrant students to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे