स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला दिलेला नियमबाह्य कचरा ठेका रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:58+5:302021-05-26T04:35:58+5:30
धुळे : शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी वाॅटरग्रेस कंपनीला देण्यात आली आहे. मात्र कामात सुधारणा होत नसल्याने गंभीर स्वरूपाच्या तक्रारी ...
धुळे : शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी वाॅटरग्रेस कंपनीला देण्यात आली आहे. मात्र कामात सुधारणा होत नसल्याने गंभीर स्वरूपाच्या तक्रारी कंपनीवर दाखल झाल्या आहेत. गेल्यावर्षी लाॅकडाऊन काळात कचरा संकलनात भ्रष्टाचार झाल्याने स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीचा ठेका नियमबाह्य असल्याने हा ठेका रद्द करून चाैकशीचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आमदार डाॅ. फारुख शाह यांनी दिले.
शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीने महानगरपालिकांसमवेत करारनामा केला होता. शहराची लोकसंख्या अंदाजे चार लाख असताना लॉकडाऊन काळात महानगरपालिका क्षेत्रात २०० टन कचरा जमा झाल्याची खोटी माहिती कंपनीकडून सादर करण्यात आली होती. शहरातील अनेक प्रभागात आजही घंटागाडी कचरा संकलनासाठी पोहोचत नाही, तर कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी घंटागाडीत रेती, माती, दगड टाकण्यात आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाॅटरग्रेस कंपनीवर कारवाई टाळण्यासाठी दुसऱ्या एका स्वयंभू ट्रान्सपोर्ट नावाच्या कंपनीला महानगरपालिकेने ६० टक्के दरवाढ करून ठेका दिला. मात्र सदरची दरवाढ नियमबाह्य आहे. नगरसेवकांचा ठेका देण्यास विरोध असताना हा ठेका स्वयंभू कंपनीला देण्यात आला आहे. सदर कचरा ठेका नियमबाह्य असल्याने रद्द करून संगनमत करून ठेका देणाऱ्या मनपाच्या काही भ्रष्ट अधिकारी आणि पदाधिकारी यांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार डाॅ. शाह यांनी केली होती. त्यानुसार राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाैकशीचे आदेश दिले आहेत.