Dhule Municipal Election 2018 : उमेदवारांनी रॅलीने केला प्रचाराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:12 PM2018-12-07T23:12:09+5:302018-12-09T12:41:57+5:30
प्रचार थांबला : शनिवारी सायंकाळी कर्मचारी व अधिकारी मतदान केंद्रावर रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसापासून सुरु असलेला प्रचार शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता संपला. रविवारी होणाºया मतदानाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाचे साहित्य घेऊन शनिवारी सायंकाळी सर्वच अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होतील. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसापासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी सायंकाळी साडे पाच वाजता थांबली.
शक्ती प्रदर्शन - शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी शक्ती प्रदर्शन केले. काँग्रेस- राष्टÑवादी आघाडीतर्फे प्रभागातून प्रचार रॅली किंवा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यात आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे सहभागी झालेत. लोकसंग्रामतर्फे एकत्ररित्या प्रचार रॅली काढण्यात आली. त्यात १९ प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराच्या गाडया आणि शेवटी नदीकाठावरील झुलता पुलावर बसविण्यात येणारी शंकराची मूर्तीही ट्रॉलीवर आणण्यात आली होती. रॅलीत आमदार अनिल गोटे, माजी नगराध्यक्ष हेमा गोटे यांच्यासह सर्व उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. भाजपतर्फे अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्यापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यात माजी महापौर मंजुळा गावीत, डॉ.माधुरी बाफना यांच्यासह अन्य पदाधिकारी महिला सहभागी झाल्या होत्या. शिवसेनेतर्फे पेठ भागातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत खासदार संजय राऊत यांच्यासह सर्वच पदाधिकारी व उमेदवार सहभागी झाले होते. सायंकाळी साडे पाच वाजेनंतर सर्वच प्रचार तोफा थंडावल्यात.
शहरातील बॅनर, झेंडे काढले - सर्वच पक्षाने आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी दुपारीच सर्वच बॅनर, झेंडे काढून घेतले. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या कार्यवाहीची पाहणी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केली़ नगावबारी येथील शासकीय गोडाऊन येथे मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी सकाळी ९ वाजता मतदान केंद्रावरील कर्मचाºयांना साहित्य वाटप केले जाणार आहे़ नगावबारी येथील व्यवस्थेची पाहणी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व अन्य अधिकारी यांच्यासमवेत करण्यात आली़ यात वाहन व्यवस्था, मतदान साहित्य वाटप व्यवस्था, मीडिया कक्ष उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ त्याप्रमाणे आवश्यक त्या दुरुस्त्या व बदल करण्यात आले़ मतदान कर्मचाºयांना मतदान प्रक्रियेत तसेच मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही व सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असे नियोजन प्रशासनाने केले आहे़
आज साहित्य वाटप, कर्मचाºयांसाठी बसेसची व्यवस्था़
नगावबारी येथील शासकीय गोडाऊन येथे सकाळी नऊ वाजता सदर ठिकाणाहून मतदान यंत्र व अन्य साहित्यांचे वाटप होणार आहे़ सदर मतमोजणी केंद्र शहरापासून लांब असल्याने तेथे जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे़ मतदान केंद्रावर नियुक्त केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी व शिपाई यांना या परिवहन सेवेचा लाभ घेता येणार आहे़ त्यासाठी धुळे आगार व देवपुर बस स्थानक येथून सकाळी साडेआठ वाजता व नऊ वाजता मतमोजणी केंद्रापर्यंत जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सकाळी ९ वाजता मतदान अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी उपस्थित राहणार आहे. सर्व मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचाºयांना याठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारुन सर्व कर्मचारी व अधिकारी हे केंद्रावर पोहचणार आहे.