शॉर्टसर्किटने आग लागल्याने कार खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:47 AM2018-05-13T11:47:42+5:302018-05-13T11:47:42+5:30
जीवितहानी टळली : दोंडाईचा-चिमठाणे रस्त्यावरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा-चिमठाणे रस्त्या दरम्यान एका हॉटेलनजीक कारला शनिवारी दुपारी आग लागली़ या घटनेत कार संपूर्ण जळून खाक झाली़ सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही़ शॉर्टसर्किटने कारला आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक सुका पाटील व त्यांची पत्नी इंदुबाई पाटील हे शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथे नातेवाइकांकडे लग्नाला गेले होते. (एमएच १८ व्ही ४९९) या क्रमांकाच्या कारने धमाणे येथून लग्न आटोपून दोंडाईचा - धुळे रस्त्याने चिमठाणे येथे ते जात होते़ दोंडाईचानजिक ३ किमी इतक्या अंतरावर असलेल्या हॉटेल प्रशांतनजिक कारला अचानक शॉर्टसर्किट झाल्याने कारला आग लागली़ आग लागल्याचे लक्षात येताच पाटील दाम्पत्याने तात्काळ कार थांबवून ते बाहेर पडले़ यावेळी कार संपूर्ण जळाली़ तत्काळ याबाबत अग्निशामक विभागाशी संपर्क साधून कारला लागलेली आग विझविण्यात आली.
या दुर्घटनेत पाटील दाम्पत्यास काहीही दुखापत झाली नाही़ दोनही सुरक्षित आहेत. कारला लागलेली आग पाण्याने विझविण्यात आली़ घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़