सुटय़ा एक रुपयासाठी वाहकाने वृद्धाला उतरवले
By admin | Published: February 16, 2017 12:27 AM2017-02-16T00:27:51+5:302017-02-16T00:27:51+5:30
एक रुपया सुटा नसल्याने एका वृद्ध प्रवाशाला एसटीच्या वाहकाने भररस्त्यात उतरवून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी साक्री-निजामपूर दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.
साक्री : भाडय़ासाठी फक्त एक रुपया सुटा नसल्याने एका वृद्ध प्रवाशाला एसटीच्या वाहकाने भररस्त्यात उतरवून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी साक्री-निजामपूर दरम्यान घडल्याचे समोर आले आहे. सहप्रवाशांनी याबाबत राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे तक्रार केली. त्याची दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
येथील बसस्थानकातून सोमवारी सकाळी 11 वाजता सटाणा आगाराची एमएच 40 वाय 5989 या क्रमांकाची नाशिक-नंदुरबार बस निजामपूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाली. एक वृद्ध शेतकरी निजामपूरला जाण्यासाठी या बसमध्ये बसले होते. तिकिटासाठी त्यांनी 100 रु.ची नोट दिली. निजामपूरचे भाडे 11 रुपये होते. त्यामुळे वाहकाने शेतक:याकडे वरचा सुटा एक रुपया मागितला. परंतु सुटा एक रुपया नाही, असे वाहकाला सांगितल्यावर वाहकाने येथून पाच कि.मी. अंतरावर बस थांबवून वृद्ध शेतक:यास खाली उतरवून दिले. यावेळी याच बसमधून प्रवास करणारे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक अविनाश सोनार यांनी वाहकाला याचा जाब विचारला. त्यांना वाहकाने उद्धट उत्तरे दिली. सोनार यांनी लगेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मंत्री रावते यांनीच कॉल रीसिव्ह केला. सोनार यांनी, शिवशाहीच्या नावाने सरकार आले. परंतु तुमच्या राज्यात वृद्ध शेतक:यावर अन्याय झाल्याचे त्यांना सांगितले. यावर एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुमच्याशी बोलतील, असे सांगून फोन बंद केला. 10 मिनिटात एसटीचे व्यवस्थापकीय संचालक यांचा फोन येताच त्यांना सर्व प्रकार कथन केला. त्यावर वाहक एस. बी. जोंधळे यांच्यावर चौकशीअंती कारवाईचे आश्वासन दिले.
दोन दिवसांत काय कारवाई झाली, याबाबत सोनार यांनी सटाणा आगारप्रमुख के.आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला. वरिष्ठ स्तरावरून कारवाईचे आदेश प्राप्त झाले असून तुम्ही लेखी तक्रार द्या, असे सांगण्यात आले.