धुळ्यातील ‘त्या’ रस्त्याप्रकरणी हरित लवादाकडे दाद मागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:27 PM2017-12-22T21:27:43+5:302017-12-22T21:28:56+5:30
पांझरा नदीकाठ परिसर : नगरसेवक नरेंद्र परदेशी यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील पांझरा नदीकाठाच्या दोन्ही बाजूस होणारा रस्ता बेकायदेशीर असल्याचे सांगत नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु, या रस्त्याचे प्रकरण पर्यावरण विभागाशी संबंधित असल्याने औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी राष्टÑीय हरित लवादाकडे (एनजीटी) दाद मागावी, असे सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणी राष्टÑीय हरित लवादाकडे दाद मागणार असल्याची माहिती नगरसेवक परदेशी यांनी दिली.
शासनाने पांझरा नदीकाठी रस्ते बांधण्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केला होता.मात्र, सदरचे अनुदान महापालिकेला देय असताना आमदार अनिल गोटे यांनी ते सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करण्यास भाग पाडले आहे़ याकामी लागणारा महासभेचा ठराव अद्याप झालेला नाही़ तसेच या रस्त्यांसाठी शासनाच्या विविध विभागांची परवानगी आवश्यक असून तीदेखील घेण्यात आलेली नाही़ त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा व मंजूर निधीत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी यापूर्वी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी जिल्हा प्रशासनाकडेही केली होती. तसेच याप्रकरणी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठातही याचिका दाखल केली होती.
प्रकरण न्यायालयात असताना रस्ते काम सुरू
नगरसेवक परदेशी यांनी याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना शहरात पांझरा नदीकाठाच्या दोन्ही बाजूला रस्ते कामास सुरुवात झाल्याचे मांडले. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे या रस्ते कामाला स्थगिती द्यावी, असे परदेशी यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. मात्र, न्यायालयाने स्थगिती देता येणार नाही, असे म्हटले.