जनावरांनी भरलेले वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:03 PM2019-03-31T12:03:53+5:302019-03-31T12:05:25+5:30
शिरपूर : वाहनात कोंबली होती १६ जनावरे, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरपूर : इंदौर येथून धुळे येथे विना परवाना म्हैस व पारडू कोंबलेल्या अवस्थेत घेवून जाणाऱ्या एका वाहनाला शिरपूर पोलिसांनी शिरपूर फाट्यावर पकडले़ दरम्यान, गाडीसह १० लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ संशयित चालकासह, क्लिनर व मजूर असे तिघांना अटक करण्यात आली आहे़
३० रोजी पहाटे १़३० वाजेच्या सुमारास शिरपूर पोलिस महामार्गावर गस्त घालीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून शिरपूर फाट्यावर एका वाहनाला थांबविले़ गाडी क्रमांक सीजी-०४-एलसी-७६४१ वरील चालक मोहम्मद इस्तीयाक कल्लू खान (२८) रा़रिछाबडी ता़महू जि़इंदौर, क्लिनर मोहम्मद आमिन अस्लम खान (२१) रा़बेडावस्ती ता़महू व मजूर अब्दुल रहिम कुरेशी (२८) रा़टानमोहल्ला ता़महू या तिघांकडे गुरे वाहतुक करण्यासंबंधीत परमीट असल्याची विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ ताडपत्री उघडून पाहिली असता अपुऱ्या जागेत ८ म्हैशी, २ रेडे, २ रेडकू व ४ पारडी असे १६ जनावरे कोंबलेल्या स्थितीत आढळून आले़ पोलिसांनी ७ लाखाच्या गाडीसह ३ लाख ७० हजार रूपयांची जनावरे असा एकूण १० लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित तिघे संशयितांविरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा सन १९६० चे कलम ११ (१) (ड) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़