रुग्णवाहिकेतून गुरांची वाहतूक; दोघांना पकडले, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:23 PM2024-01-17T18:23:44+5:302024-01-17T18:24:49+5:30
रुग्णवाहिकेत काय आहे, याची विचारणा चालकाकडे केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
सुनील साळुंखे
शिरपूर : रुग्णवाहिकेतून होणारी गुरांची वाहतूक शिरपूर तालुका पोलिसांनी गुरुवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास हाडाखेड नाक्याजवळ रोखली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, गुरे व गाडी असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सेंधव्याकडून शिरपूरच्या दिशेने एका रुग्णवाहिकेतून (क्र. एमपी ०९ - बीए ९८१) गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सीमा तपासणी नाका हाडाखेड नाक्याजवळील गुरुद्वारासमोर सापळा रचला. बुधवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास संशयित रुग्णवाहिका येताना दिसताच पोलिसांनी गाडीला अडविले.
रुग्णवाहिकेत काय आहे, याची विचारणा चालकाकडे केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने रुग्णवाहिकेची तपासणी केली असता, त्यात १० गुरे कोंबलेली आढळून आली. या गुरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली. गुरांची किंमत दीड लाख तर रुग्णवाहिकेची किंमत पाच लाख रुपये आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून चालक विजय प्रल्हाद चौहान (वय २९) व विक्रम बालाराम चौहान (वय ३०, दोन्ही रा. मालवीनगर, महू, जि. इंदूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.