धुळ्यानजिक सुरत बायपासवर दारुसाठा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 09:33 PM2020-08-16T21:33:39+5:302020-08-16T21:34:02+5:30
दोघांना अटक : धुळे तालुका पोलिसांची कारवाई
धुळे : महिंदळे गावाकडून चौगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांची तपासणी तालुका पोलिसांच्या पथकाने केली़ त्यात अवैध दारु घेऊन जात असताना आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली़ दारुसह दुचाकी असा एकूण ५१ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई रविवारी दुपारी सुरत बायपास चौफुलीवरील कुष्ठरोग आश्रमजवळ करण्यात आली.
विदेशी दारुची विक्री करण्यासाठी एमएच १८ बीजे ९७७२ या क्रमांकाच्या दुचाकीने महिंदळेकडून चौगावकडे जात असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना मिळाली़ त्यांनी लागलीच आपल्या पथकाला कारवाईसाठी पाठविले़ सुरत बायपास चौफुलीवरील कुष्ठरोग आश्रमजवळ या क्रमांकाची दुचाकी येताच ती अडविण्यात आली़ चालकाची चौकशी आणि दुचाकीत असलेल्या साहित्याची तपासणी करण्यात आली़ या दुचाकीत विदेशी दारुच्या १८० मिली लीटर मापाच्या ७२ नग सीलबंद बाटल्यांचा बॉक्स आढळून आला़ विनापास परमीट शिवाय हा दारुचा साठा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकी वरुन करताना मिळून आल्याने एकनाथ पांडूरंग शिंदे आणि पंढरीनाथ साहेबराव सूर्यवंशी (दोन्ही रा़ चौगाव ता़ धुळे) यांना दुचाकीसह अटक करण्यात आली आहे़
ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मोरे, प्रविण पाटील, रमेश गावित, राकेश महाले, धिरज सांगळे यांनी केली आहे़