धुळे पोलिसांच्या मदतीला ‘सीसीटीव्हीच’!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 02:28 PM2018-03-04T14:28:43+5:302018-03-04T14:29:47+5:30
गुड्या खून प्रकरण, पारोळा रोडवरील पेट्रोल पंपावरील दरोडा, देवपुरातील इंदिरा गार्डन जवळ चेन स्रॅचिंग करणारे टोळके अशा कितीतरी प्रकरणातील संशयितांना जेरबंद करण्यात सीसीटीव्ही कॅमेराची मदत पोलिसांना मिळाली आहे.
-देवेंद्र पाठक
धुळे : गुड्या खून प्रकरण, पारोळा रोडवरील पेट्रोल पंपावरील दरोडा, देवपुरातील इंदिरा गार्डन जवळ चेन स्रॅचिंग करणारे टोळके अशा कितीतरी प्रकरणातील संशयितांना जेरबंद करण्यात सीसीटीव्ही कॅमेराची मदत पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे धुळ्यासारख्या संवेदनशिल शहरात सीसीटीव्ही लावण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांची मदत घेवून कॅमेरा बसविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नात आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी १ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरी दिली होती़ तो प्रस्ताव गृह विभागाला पाठविण्यात आला आहे. मात्र पोलीस प्रशासनाने याच रकमेवर अवलंबून न राहता शहरातील सर्वसामान्य नागरिक व व्यापा-यांची मदत घेत कॅमेरे बसविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
धुळे शहर अतिसंवेदनशील म्हणूून ओळखले जाते़ धुळे शहरात किरकोळ कारणाचे रुपांतर दंगल, दगडफेकीत होते़ अशाच काही कारणावरून २००८ व २०१३ मध्ये शहरात दोन गटांत दंगल घडली होती़ त्यात जीवित व वित्त हानी झाली होती़ तसेच जिल्ह्यात विविध सणोत्सव उत्साहात साजरे होत असतात़ अशा वेळी नागरिक ठिकठिकाणी गर्दी करत असतात. अशा वेळी काही कारणावरून वाद झाला तर त्याचे हाणामारीत रूपांतर होते. त्यामुळे नागरिकांची धावपळ होते़ अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो़ तो निर्माण होवू नये म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे़ तसे झाल्यास गुन्हेगारांवर जरब बसविणे शक्य होणार आहे़ अशा विश्वासही पोलीस प्रशासनाकडून व्यक्त होतो़ चोरी, चेनस्रॅचिंग, महिलांची छेड, हाणामारीच्या घटना रोखण्यासही पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेºयांची मदत होणार आहे.
जिल्हा नियोजन व विकास समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस विभागाने जिल्हाधिकाºयांना १५ जून २०१४ रोजी दिला होता़ मात्र तो अनेक महिने पडून होता़ त्यानंतर नव्याने रूजु झालेले जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी सीसीटीव्ही बसविण्यासाठी १ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली़ मात्र गृह विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अद्याप प्राप्त झालेले नाही़ तो प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे प्रलंबित आहे.
- शहरातील मुख्य बाजारपेठ लगत पारोळा रोडचा समावेश होतो. याठिकाणी सर्वसामान्य नागरीकांची वर्दळ असते़ काही वेळेस महिलांच्या छेडखानीचे तर कुठे वाहन चोरीच्या घटना घडत असतात.
- त्याला आळा बसावा यासाठी वर्दळीच्या भागासह व्यापारी प्रतिष्ठान, सोने-चांदीचे दुकाने, बँका, शासकीय कार्यालयासह आग्रा रोड, पारोळा रोड आणि गजानन कॉलनीसारख्या संवेदनशिल भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. याकामी शेवटी नागरिकांची मदत पोलिसांना मिळाली आहे़
- गुड्या खून प्रकरणातील संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. नाहीतर या प्रकरणाचा तपास करताना पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली असती, ही वस्तुस्थिती आहे़
- पोलीस वाहनांवर सीसीटीव्ही बसविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विचाराधीन होते़ त्यानुसार प्रातिनिधीक स्वरुपात धुळे शहर पोलीस ठाण्यातील अधिका-यांच्या वाहनांवर अशाप्रकारचा कॅमेरा बसविण्यात आला़ उर्वरीत इतर अधिका-यांच्या वाहनांवर अशा प्रकारचा कॅमेरा बसविण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले़