धुळ्यातील केंद्र संचालक, पर्यवेक्षिकेला निलंबित करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:01 PM2018-02-23T12:01:48+5:302018-02-23T12:02:42+5:30
सहा केंद्राचे केंद्रसंचालक बदलविले
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बारावीच्या हिंदी पेपराच्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी उर्दू हायस्कुल केंद्रावर एका विद्यार्थ्यास कॉपी करतांना रंगेहात पकडले. दरम्यान या केंद्राचे केंद्र संचालक व पर्यवेक्षिकेला निलंबित करण्याचे आदेश सीईओंनी दिल्याची माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांनी दिली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील सहा केंद्रावरील केंद्र संचालकांनाही बदलविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ४४ केंद्रावर २५ हजर ८५५ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. यावर्षी कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी परीक्षा मंडळाबरोबरच प्रशासनानेही कडक पाऊले उचलली आहेत.
बारावीचा गुरूवारी हिंदीचा पेपर होता. पेपर सुरू असतांनाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी दुपारी धुळ्यातील नॅशनल उर्दू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या केंद्राला अचानक भेट दिली. त्यांनी केवळ भेटच दिली नाही तर कॉपी करणाºया विद्यार्थ्याला रंगेहात पकडत शिक्षकांच्या स्वाधीन केले.
पर्यवेक्षिका, केंद्रसंचालकावर निलंबनाची कारवाई
दरम्यान या केंद्राच्या पर्यवेक्षिका शबाना बिलाल अहमद व केंद्र संचालक इक्बाल अहमद मोहंमद नजीर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना दिले. जिल्ह्यात अशाप्रकारे पहिल्यांदाच कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान जिल्ह्यात हिंदीच्या पेपरला एकच कॉपी केस झालेली आहे. उर्वरित ठिकाणी हिंदीचा पेपर सुरळीत पार पडल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.
सहा केंद्रावरील केंद्र संचालक बदलविले
जिल्ह्यात असलेल्या उपद्रवी केंद्रावरील केंद्र संचालक तत्काळ बदला असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी माध्यमिक शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने गुरूवारी रात्रीच सहा केंद्र संचालकांना बदलवून त्यांच्या जागी नवीन केंद्र संचालक नियुक्त केले. हे केंद्र संचालक शुक्रवारी त्या-त्या केंद्रावर हजर झाले होते.