धुळे जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतींची केंद्रीय एनएलएम पथकाकडून पहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:50 AM2019-03-13T11:50:02+5:302019-03-13T11:51:21+5:30
घरकूल लाभार्थ्यांशी साधला संवाद, ग्रामपंचायत दप्तराची तपासणी
आॅनलाइन लोकमत
धुळे : केंद्र शासनातर्फे ग्रामविकासाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्याची कशाप्रकारे अमलबजावणी झाली याची पहाणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या नॅशनल लेव्हल मॉनिटरींग टीमने नुकतीच जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींना भेटी देवून तेथील घरकूल, मनरेगा अंतर्गत झालेल्या विहिरी, शेततळ्यांची पहाणी केली. हा पाहणी अहवाल केंद्राला सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी.एम. मोहन यांनी दिली.
केंद्र शासनातर्फे ग्रामीण भागात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात असातत. त्याची अमलबजावणी, व झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनातर्फे नॅशनल लेव्हल मॉनिटरींग पथकाची नियुक्ती करण्यात आलेली होती.
२०१८-२०१९ यावर्षात झालेल्या विविध कामांची पहाणी करण्यासाठी एनएलएम पथकाचे सदस्य महादेवय्या हे ५ ते १२ मार्च या कालावधीत धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
त्यांनी धुळे तालुक्यातील मोरशेवडी, बल्हाणे, गोंदूर, कौठळ, शिरपूर तालुक्यातील करवंद, भावेर, नांथे, व साक्री तालुक्यातील नवापाडा (ब्राह्मणवेल), धनेर, चोरवड अशा एकूण १० ग्रामपंचायतींना भेटी दिल्या.
जिल्ह्यात मुख्य करून महात्मा गांधी रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), प्रधानमंत्री सडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, वॉटरशेड, महिला बचतगट, महसूल विभागाकडील राष्टÑीय पेंशन योजना, दिन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, वैय्यक्तिक लाभाच्या योजनांमधील कामांना भेटी दिल्या.
या पथकाने ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी केली. तसेच घरकुलांची पहाणी करून,लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच पथकाने वृक्षलागवड, गुरांसाठी गोठा, शेततळे, विहिरी, पेव्हर ब्लॉक रस्त्यांची पहाणी केली. नावापाडा (ब्राह्मणवेल) येथे कृषीचे ड्रीप इरिगेशन तर धनेर (ता.साक्री) येथे रोटावेटर, ट्रॅक्टर, कांदा स्टोरेज शेड यांची पहाणी केली. या सर्व कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
करवंद ग्रामपंचायतीतर्फे नागरिकांना मिनरल वॉटर प्लॅँटने प्रिपेड एटीएम कार्डद्वारे ५० पैेसे प्रतिलिटर पिण्याचे पाणी पुरविले जाते. या कार्यपद्धतीची त्यांनी पहाणी केली.