धुळयात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत ‘चैतन्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:06 PM2018-03-17T18:06:54+5:302018-03-17T18:06:54+5:30
फुले, हार, हारकंगण खरेदीसाठी गर्दी, कोट्यवधींची उलाढाल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात हिंदू नववर्षानिमित्त उत्साहाचे वातावरण असून बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे़ नागरिकांकडून विविध वस्तुंच्या खरेदीला प्राधान्य दिले जात असून एकमेकांना मराठी नववर्षाच्या देण्यास शनिवारपासूनच सुरूवात झाली आहे़
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला गृह खरेदी, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी नागरिकांकडून करण्यात येत असते़ बाजारात कितीही तेजी असली तरी त्याला प्रतिसाद लाभत असतो़ यंदाच्या वर्षीही गृहखरेदीसह सोने, दुचाकी व चारचाकी वाहने आणि विविध गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीवर भर दिला जात आहे़ केंद्र व राज्य सरकारने यंदा अर्थसंकल्पातून अनेक नवनवीन योजनांवर भर दिला असून सर्वसामान्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले आहेत़ त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी येत असून आर्थिक उलाढाल वाढत आहे़ बाजारात हारकंगण, फुले व पूजासाहित्य विक्रेते व ग्राहकांची देखील गर्दी होत आहे़