चंद्रकांत सोनार हे जनतेतील महापौर कुटूंबियांच्या भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:46 PM2018-12-31T12:46:45+5:302018-12-31T12:48:14+5:30
अनुभव व ओळख-परिचयाचा विकासाला फायदा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेचे सातवे महापौर म्हणून चंद्रकांत मधुकर सोनार यांची आज औपचारिक निवड होणार आहे़ जनतेतील महापौर हीच त्यांची खरी ओळख असेल, अशी भावना सोनार यांच्या कुटूंबियांनी व्यक्त केली़
चंद्रकांत सोनार यांचे मुळ गाव धुळे हेच असून ते गेल्या अनेक वर्षांपासून जुने धुळे परिसरात वास्तव्यास आहेत़ पूर्वी महापालिकेत बिगारी म्हणून काम केले़ १९८७ मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला़ आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा पहिल्यापासून प्रचंड जनसंपर्क आहे़ सोनार यांच्या कुटूंबात त्यांच्या पत्नी शैलजा सोनार, मुले देवेंद्र, भूषण व सुना श्रेया आणि निशा व चिमुकली नात देवंशी असा परिवार आहे़ मुलगी नेहाचा विवाह झाला आहे़ जनसेवा करतांनाच बापू कधी कुटूंबाकडेही दुर्लक्ष करीत नाही, असे त्यांचे कुटूंबिय सांगतात़ ‘चंदूबापू’ म्हणून परिचित असलेले सोनार हे समाजकारण, राजकारणात नेहमीच अग्रेसर असतात़ १९९१ मध्ये प्रथम नगरसेवक झालेले चंद्रकांत सोनार हे सलग सातव्यांदा विजयी झाले असून आज महापौर पदावर विराजमान होत आहेत, याचा अभिमान वाटत असल्याची भावना कुटूंबिय व्यक्त करतात़ तर सोनार यांची बिगारी ते महापौर पदापर्यंतची वाटचाल अनेकांना स्फुर्ती देणारी असल्याचे हिरामण गवळी सांगतात़ गवळी व सोनार हे १९७४ पासूनचे मित्र असून त्यांनी सोबत बिगारी काम केले आहे़ महापौर पदावर विराजमान झालो तरी दुचाकीचाच वापर करणार असून सर्वसामान्यांमध्ये मिसळत राहू, असे चंद्रकांत सोनार यांनी स्पष्ट केले़ शिवाय स्वच्छता, एलईडी पथदिवे, पार्किंगचा प्रश्न, मुलभूत सुविधा देणार असल्याचे ते म्हणाले़
चंद्रकांत सोनार यांनी आतापर्यंत नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला आहे़ त्याचे फलित त्यांना महापौर पदाच्या माध्यमातून मिळाले़ ते जनतेतील महापौर असून त्यांच्या अनुभवाचा, ओळख परिचयाचा शहराला फायदा होईल़
-शैलजा सोनार,
चंद्रकांत सोनार यांच्या पत्नी
वडिलांनी केलेल्या राजकीय प्रवासात अनेक अडथळयांचा सामना केला आहे़ परिस्थितीवर मात करतांनाच त्यांनी कुटूंब, सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळा कायम ठेवला़ ते महापौर झाल्याचा फायदा जनतेला होणार आहे़
-देवेंद्र सोनार, मुलगा
वडिलांनी राजकारणात दिलेल्या योगदानाची दखल पक्षाने घेतली आहे़ बापू महापौर झाल्याचा आनंद कुटूंबाबरोबरच प्रभागातील नागरिकांना आहे़ शहराच्या विकासाला बापूंच्या अनुभवाचा फायदा होईल़
-भुषण सोनार,मुलगा