ट्रकचा पाठलाग, ५० लाखांची दारू सोडून चालक फरार; बोराडी गावाजवळील घटना
By देवेंद्र पाठक | Published: December 6, 2023 12:50 AM2023-12-06T00:50:26+5:302023-12-06T00:50:48+5:30
ही कारवाई शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाजवळ सोमवारी रात्री करण्यात आली.
धुळे : मध्य प्रदेश राज्यातून चोरट्या मार्गाने बोराडी गावाकडून शिरपूरकडे येत असताना शिरपूर पोलिसांनी संशयित ट्रकचा पाठलाग केला. अंधाराचा फायदा आणि पोलिसांच्या कारवाईला घाबरून चालक, सहचालक वाहन सोडून पसार झाले. ही कारवाई शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाजवळ सोमवारी रात्री करण्यात आली.
पोलिसांनी ट्रक, दारू असा सुमारे ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पकडण्यात आलेली विदेशी दारू पंजाब राज्यात विक्रीचा परवानगी असताना इतर राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले. सेंधवा-मध्य प्रदेशकडून बोराडी-वाडीमार्गे आरजे १९ जीएच ८४८२ क्रमांकाच्या ट्रकमध्ये अवैध दारूची चोरटी वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार वाडी गावाजवळ सापळा लावण्यात आला होता.
गाडी बोराडी गावाकडून वाडी गावाकडे येत असल्याचे दिसले. चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले असता त्याने न थांबता परत गाडी बोराडी गावाकडे सुसाट वेगाने पळविली. पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू ठेवला. दरम्यान, पोलिसांनी बोराडी ग्रामस्थांना सांगून गाडी अडविण्यास सूचित केले. त्यानुसार सदर गाडी बोराडीजवळ अडविण्यात आली. त्यानंतर गाडीतील चालक व सहचालक गाडी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
पोलिसांनी ताडपत्रीने झाकलेल्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खोके दिसून आलेत, त्या खोक्यांमध्ये दारूच्या बाटल्या होत्या. विदेशी दारूच्या काचेच्या बाटल्यांवरील किंमत, बारकोड तसेच बुचवरील बॅण्ड रोल खोडून नष्ट केलेला होता. विदेशी दारूचा साठा ४९ लाख २१ हजार १८० रुपये व ३० लाखांची गाडी, असा एकूण ७९ लाख २१ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत शिरपूर पोलिसात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधिक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, संदीप दरवडे, हेमंत खैरनार, गणेश कुटे यांच्यासह पोलिस हवालदार ललित पाटील, प्रेमसिंग गिरासे, रवींद्र आखडमल, प्रमोद ईशी, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटू साळुंखे, सचिन वाघ, मनोज महाजन, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, दीपक खैरनार, विवेकानंद जाधव, भूपेश गांगुर्डे, मोहन सूर्यवंशी, सुशील गांगुर्डे, शांतीलाल पवार, रविंद्र महाले, मिथून पवार, शरद पारधी, चेतन भावसार यांच्या पथकाने कारवाई केली.