बनावट पावतीद्वारे ग्रामपंचायतीची साडेसात लाखांत फसवणूक
By अतुल जोशी | Published: March 8, 2024 06:22 PM2024-03-08T18:22:22+5:302024-03-08T18:23:10+5:30
नेर ग्रामपंचायतीच्या तिघा लिपिकांवर गुन्हा दाखल
अतुल जोशी, धुळे : तालुक्यातील नेर ग्रामपंचायतीच्या वसुली लिपिकांनी बनावट पावती पुस्तकाद्वारे घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करीत, ग्रामपंचायतीची तब्बल साडेसात लाखात फसवणूक केली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला तीन लिपिकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुनील देसले यांनी धुळे तालुका पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार हर्षल भगवान मोरे (वय ३३), राकेश श्रीराम जाधव (३३) व संजय लाला वाघ (वय ५४, तिघे रा. नेर, ता. धुळे) या तिघा लिपिकांनी २०१५ ते २०२० या कालावधीत नेर ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी करवसुली नियमाप्रमाणे ग्रामनिधी व पाणी पुरवठा बँक खात्यात जमा करणे गरजेचे होते.
परंतु तसे न करता संशयितांनी बनावट नमुना नंबर १० घरपट्टी, पाणीपट्टी पावती पुस्तकाद्वारे ग्रामस्थांकडून एकूण ७ लाख ५४ हजार ३३३ रुपयांची वसुली करून ग्रामनिधीचा अपहार केला व ग्रामपंचायतीची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांवर धुळे तालुका पोलिस स्टेशनला फसवणुकीची गुन्हा दाखल झाला आहे.