अमरावती प्रकल्पात एक तपापासून ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:50 PM2019-02-21T22:50:51+5:302019-02-21T22:52:03+5:30
प्रकाशा-बुराईतून पाणी टाकण्याची वारंवार मागणी : एक अपवाद वगळता मृतसाठा क्षमता देखील ओलांडली नाही
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पात प्रकाशा-बुराई योजनेतून पाणी टाकण्याची प्रक्रिया लवकर मार्गी लावा, अशी मागणी वारंवार होत आहे. तब्बल १३ वर्षापासून प्रकल्पात ठणठणाट असून मालपूरसह परिसरातील ग्रामस्थांना तापीच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.
येथील अमरावती मध्यम प्रकल्प हा धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेवर शिंदखेडा तालुक्याच्या पूर्वेला अमरावती व नाई नदीवर मालपूर गावाजवळ बांधलेला मध्यम प्रकल्प आहे. शासन निर्णयानुसार १९७९ अन्वये ३५८.१४ लाख किंमतीस मुळ प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यास १९९५ मध्ये २८७६.९१८ लक्ष किंमतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली. सन १९९९-२००० दरसूची नुसार ४८३३.७५ लाख किंमतीचा सु-सुधारीत प्रकल्प अहवालास शासन निर्णयानुसार २००१ अन्वये मान्यता प्राप्त झालेली आहे.
एवढा पैसा खर्च करुन एक अपवाद वगळता गेल्या १२ वर्षापासून मृतसाठा क्षमता देखील ओलांडलेली नसून एक थेंब सिंचनासाठी उपयोगी आलेला नाही.
हा प्रकल्प १९८० मध्ये रो.ह. योजना अंतर्गत सुरू करण्यात येवून गावातीलच मजुरांनी याचा पाया खोदल्यामुळे या प्रकल्पाची गावाची विशेष नाळ जुळलेली आहे. प्रत्यक्ष पाया खोदकाम करणारे काही मजूर आजही हयात असून साक्षीदार आहेत, प्रत्यक्ष पूर्ण क्षमतेने कायमस्वरुपी पाण्याचा साठा पाहण्याचे त्यांचे स्वप्न मात्र पूर्णत्वास आलेले नाही.
तब्बल २६ वर्षानंतर सन २००६ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास आला. शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या, परिसर सुजलाम सुफलाम होईल, परिसराला दुष्काळाचा लागलेला कलंक मिटेल असे वाटले. झालेही तसेच सुरुवातीलाच २००६ मध्ये पहिल्याच वर्षी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्यातून पाणी सोडण्याची आपतकालीन परिस्थिती उद्भवली यानंतर मात्र आजतागायत हा प्रकल्प पूर्णक्षमतेने तर सोडा मात्र मृतसाठा क्षमता देखील ओलांडू शकला नसल्याचे दिसून आले आहे.
या अमरावती मध्यम प्रकल्पात मालपूर गावासह मालखंड, वैंदाणे, मोयाने आदी भागातील शेतकºयांची सुपीक व कसदार ५५३.४० हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात गेलेली आहे. जमीनही गेली आणि प्रकल्पात पाणीही नाही. म्हणून हा प्रकल्प या भागातील शेतकºयांसाठी शाप की वरदान? हा प्रश्न या शेतकºयांना पडतो.
अमरावती मध्यम प्रकल्पाला एकूण ७२६.६० हेक्टर जमीन लागलेली असून त्यापैकी ६७१.३४ हेक्टर खासगी असून ५५.२६ हेक्टर सरकारी जमीन आहे. या प्रकल्पात वनजमिनीचा समावेश दिसून येत नाही. तसेच बुडीत क्षेत्रात एकही गाव आलेले नसून पूर्नवसन करावे लागलेले नाही. मात्र शेतकºयांची कसदार जमीन गेली व त्या मोबदल्यात आज पाणी नाही.
यासाठी प्रकाशा-बुराई योजना असो का फोफाद्या धरणाच्या सांडव्यातून असो मात्र पाणी टाकणे गरजेचे आहे. त्याशिवाय येथील परिसर समृद्ध होणार नाही हे गेल्या १३ वर्षापासूनच्या आलेल्या अनुभवावरुन सिद्ध झाल्याचे परिसरातील शेतकºयांच्या चर्चेतून दिसून येत आहे.