अडीच लाखांचा रसायनाचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 12:56 AM2017-02-27T00:56:58+5:302017-02-27T00:56:58+5:30
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा : तालुका पोलिसांची चितोडला कारवाई
धुळे : तालुक्यातील चितोड गावातील भिलाटीलगत असलेल्या नाल्यातील काटेरी झाडाझुडपातून तालुका पोलिसांनी गावठी दारू बनविण्यास उपयोगी येणारे ३९ ड्रममध्ये भरलेला ७०० लीटर रसायनाचा साठा जप्त केला़ त्याची किंमत २ लाख ४२ हजार ७०० रुपये आहे़ याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
चितोड गावातील भिलाटीजवळील नाल्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे हातभट्टीची गावठी दारू बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांना मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी तालुका पोलिसांसह महिला व पुरुषांच्या कमांडो पथकाला सोबत घेऊन २५ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला़ परिसरात शोध घेतला असता नाल्यातील झाडाझुडपांमध्ये ३९ प्लॅस्टिकच्या दोनशे लीटर क्षमतेच्या ड्रममध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी उपयोगात येणारे गूळ व नवसागरमिश्रित ७०० लीटर रसायन मिळून आले़ ते जागीच नष्ट करण्यात आले़ तसेच नऊ पत्री ड्रम मिळून आले़ तेथे कोणीतरी बेकायदेशीररीत्या गावठी दारू तयार करण्यासाठी उपयोगात येणाºया रसायनाचा साठा करून ठेवलेला होता़ याप्रकरणी पोक़ॉ. सचिन वाघ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध मुंबई प्रोव्हिजन कायदा कलम ६५ (ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़