बोकड विकल्याचे पैसे न दिल्याने मुलाने केला जन्मदात्याचा खून
By admin | Published: September 12, 2016 07:13 PM2016-09-12T19:13:44+5:302016-09-12T19:13:44+5:30
कड विक्रीचे पैसे घर खर्चास न दिल्याच्या वादावरून मुलाने बापाचा कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना घडल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. १२ - तालुक्यातील बोराडी येथे बोकड विक्रीचे पैसे घर खर्चास न दिल्याच्या वादावरून मुलाने बापाचा कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना घडल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मारेकरी मुलास जेरबंद करण्यात आले असून त्यास १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
गुरुवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ दिनकर डेडा पावरा यास दारूचे व्यसन होते. तो काही कामधंदा करत नव्हता़ मुलांच्या कमाईवर दारू पिवून मजा मारत होता. राहुल दिनकर पावरा (२३) याने काही महिन्यांपासून २ बोकड पाळले होते, त्यांची निगराणी तो राखत होता़ जेणेकरून सदर बोकड बकरी ईदला (कुर्बानीला) अधिक भावाने विकले जातील म्हणून निगा राखत होता़ त्यापूर्वीच त्याचे वडील दिनकर डेडा पावरा (४५) यांनी एका खाटीक इसमाला २० हजार रूपये किंमतीत विकून देण्यापोटी १० हजार रूपये घेवून खाण्यापिण्यात पैसे उडवले. हे पैसे घर खर्चाला दिले नाहीत़ सर्व पैसे खर्च करून टाकलेत़ त्याचा राग येवून त्या दोघांमध्ये वाद झाला.
संतपाच्या भरात राहुलने जन्मदाता दिनकर पावरा याच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घालून जागीच ठार केले़ ही घटना मयताची पत्नी वनत्याबाई हिने घराबाहेर पडून बाजूला राहणारे त्यांचे जेठ दिलीप पावरा यास सांगितले. तोपर्यंत दिनकर हा खाटेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडून मरण पावला होता. त्यांच्या उजवा कान, गाल व गळ्यावर राहुलने कुऱ्हाडीने वार केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दीड तासात आरोपी अटक
घटना घडताच मयताचा मारेकरी राहुल हा घराच्या मागील दरवाजाकडून गुपचुप निघून पसार झाला़ ही घटना गावपाटील सीताराम मनश्या पाटील यांना कळविण्यात आली़ आरोपी गावातच लपून बसला होता़ घटनेचे वृत्त कळताच सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख व पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून अवघ्या दीड तासाच्या आत लपलेला राहूल यास पावरा वाड्यातून जेरबंद केले़
याबाबत सांगवी ग्रामीण पोलिस ठाण्यात मयताचा मोठा भाऊ दिलीप डेडा पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुतण्या राहुल दिनकर पावरा याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ त्यास शुक्रवारी रोजी शिरपूर कोर्टात हजर केले असता १२ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहेत.