धुळ्याच्या कापडण्यात बालविवाह, सोनगीर पोलिसात गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: May 6, 2023 06:08 PM2023-05-06T18:08:35+5:302023-05-06T18:08:54+5:30
सर्वत्र आनंदी आनंद असतानाच मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती प्रशासनाला कळाली.
धुळे : तालुक्यातील कापडणे येथे शुक्रवारी एकाचा विवाह झाला. पण, नवरी मुलीचे वय हे १६ वर्षे ९ महिने असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले. त्यामुळे नवऱ्यासह नवरा मुलाकडचे आणि नवरी मुलीकडचे व इतर अशांविरोधात सोनगीर पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला. धुळे तालुक्यातील कापडणे येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मोठ्या धुमधडाक्यात एकाचा विवाह लावण्यात आला.
सर्वत्र आनंदी आनंद असतानाच मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती प्रशासनाला कळाली. माहिती मिळताच कापडणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नरेशकुमार तुकाराम सोनवणे (वय ५३) यांनी पथकासह जाऊन चौकशी केली. नवदाम्पत्यांची विचारपूस केली. त्यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा करून तपासणी केली. त्यात त्या नवरी मुलीचे वय १६ वर्षे ९ महिने असल्याचे समाेर आले. यातून हा बालविवाह केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.
यानंतर सोनवणे यांनी सोनगीर पोलिस ठाणे गाठून रीतसर फिर्याद दाखल केली. त्यानुसार, नवरा आणि नवरी यांच्याकडील मंडळ आणि इतर अशा सर्वांविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक विजय चौरे तपास करीत आहेत.