थाळनेर येथे बालिकेची छेड काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:10 PM2018-02-05T13:10:26+5:302018-02-05T13:46:56+5:30
धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथील घटना, पोलीस स्टेशनच्या काचा फोडल्या, कारवाईच्या आश्वासनानंतर जमाव पांगला
आॅनलाईन लोकमत
शिरपूर,जि.धुळे, दि.५ : तालुक्यातील थाळनेर येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने भारतीय सैन्य दलातील जवानाच्या १० वर्षीय बालिकेची छेड काढल्याच्या कारणावरून जमावाने त्या कर्मचाऱ्यास चांगलाच चोप दिला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संबंधिक पोलीस कर्मचाऱ्यास चोप देऊन पोलीस ठाण्यावरही दगडफेक केली. त्यात काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमाव पोलीस स्टेशनबाहेर ठाण मांडून बसला होता. डीवायएसपी संदीप गावीत,पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देऊन जमावाला शांत केले.
थाळनेर पोलीस स्टेशनचे वाहन चालक नासिर जाकीर पठाण याने गावात राहणाºया भारतीय सैन्य दलातील जवानाच्या १० वर्षीय मुलीची छेडखानी केली. ही घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत कळताच संतप्त ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी पोलीस स्टेशनच्या काचा फोडल्या. तर मुलीच्या आजीनेही संबंधित कर्मचाऱ्यास चोप दिला.
जमाव पांगविण्यात आला असून एसआरपीची तुकडी दाखल झाली आहे. पोलीस स्टेशनला सरपंच प्रशांत पाटील, मुलीचे वडील, आजी, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, डीवायएसपी संदीप गावीत बसले असून पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.