बनावट दूध वाटप करणाऱ्यांवर कारवाई करा; धुळे शहरातील नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 07:53 PM2023-04-04T19:53:41+5:302023-04-04T19:53:49+5:30
बनावट दूध वाटप करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी धुळे शहरातील नागरिकांनी केली आहे.
धुळे : शहर आणि जिल्ह्यात बाहेरून येणारे भेसळ केलेले किंवा बनावट दूध वाटप करणारे आणि ते तयार करणारे यांच्याविरोधात एसआयटी नेमून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
धुळे शहरात आणि जिल्ह्यात भेसळ केलेल्या दूध विक्रीचा धंदा तेजीत सुरू आहे. बाहेरून येणाऱ्या दुधात भेसळ केलेली असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. धुळ्यात येणाऱ्या दुधात किती शुद्ध आणि किती भेसळ आहे, हे तपासण्यासाठी पोलिस, क्वाॅलिटी कंट्रोल अधिकारी, शासकीय दूध डेअरी अधिकारी, कृषी महाविद्यालयातील डेअरी विभागातील तज्ज्ञ प्राध्यापक, अन्न-औषध प्रशासनाचे अधिकारी, ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य यांची एक समिती स्थापन करून शहरात आणि जिल्ह्यात येणारे दूध तपासून भेसळ करणारे आणि विक्री व वितरित करणाऱ्या लोकांची तपासणी करावी आणि भेसळ किंवा बनावट दूध आढळल्यास दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य डॉ. योगेश हिंमतराव सूर्यवंशी, दिनेश सुभाष रेलन, जगदीश बोरसे, आदींनी केली आहे.