‘नागरित्व सुधारणा कायदा’ हा एकाही भारतीयाच्या विरोधात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 10:55 PM2019-12-22T22:55:34+5:302019-12-22T22:56:11+5:30
आमदार टी़ राजासिंह : धुळ्यातील हिंदू सभेत व्यक्त केले विचार, हिंदू बांधवांची उपस्थिती
धुळे : ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ एकाही भारतीयाच्या विरोधात नाही़ या कायद्याच्या अनुषंगाने भारतातील सर्वजण एकत्र येत आहेत़, असे प्रतिपादन हैद्राबाद येथील भाग्यनगरचे आमदार तथा गोरक्षक टी़ राजासिंह यांनी धुळ्यातील हिंदू सभेत व्यक्त केला़
मालेगाव रोडवरील अग्रसेन चौकात असलेल्या गिंदोडिया मैदानावर हिंदू जनजागृती समितीच्यावतीने आयोजित केलेल्या हिंदू राष्ट्र जागृती सभेत आमदार टी़ राजासिंह बोलत होते़ व्यासपीठावर हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जुवेकर आदी उपस्थित होते़
आमदार टी़ राजासिंह म्हणाले, कायद्याला विरोध करतानाही संविधानिक मार्गाने न करता जाळपोळ व साधन संपत्तीचे नुकसान केले जात आहे़ हे जाणिवपूर्वक केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला़ राज्यात गोहत्या बंदी कायदा असतानाही अवैध कत्तलखाने सुरु आहेत़ गोमातेच्या रक्षणासाठी सिध्द व्हावे असेही त्यांनी सांगितले़
राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले, कायद्याविरोधात आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या बहुसंख्य जणांना त्याबाबत अधिक माहिती नाही अपप्रचार करुन संभ्रम निर्माण केला जात आहे.
सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, एकीकडे आपण श्रीराम मंदिराचे निर्माण करण्याची मागणी करत असताना सरकारी अधिग्रहीत मंदिरात चालू असलेल्या लुटीकडे आणि धर्माच्या विध्वसाकडे आपण दुर्लक्ष करणार का? आपल्या श्रध्दास्थानांचे रक्षण करण्याचा संकल्प आपणच केला पाहिजे. समाजाला या दृष्टीने जागृत केले पाहिजे. गोमाता, मंदिरे आणि धर्मशास्त्र यांच्या रक्षणासाठी आपण शिवरायांचा आदर्श ठेवायला हवा असेही आवाहन त्यांनी केले़
क्षिप्रा जुवेकर म्हणाल्या, स्वत:चे रक्षण करण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे़ महिलांकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्यांना धडा शिकविण्याचे बळ आपल्यामध्ये असायला हवे़ त्यासाठी स्वरक्षण करण्याचे प्रशिक्षण घ्यायला हवे़ त्यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो़ केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्याही आपण सक्षम होतो़ स्वरक्षणासाठी महिलांनी प्रशिक्षण घ्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या़ याप्रसंगी हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़