धुळे शहरात महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांमध्ये जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:15 AM2018-02-12T11:15:06+5:302018-02-12T11:15:58+5:30
धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महादेव मंदिरांवर विद्युत रोषणाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महाशिवरात्रीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्यामुळे शहरात सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील महादेव मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील अनेक मंदिरांमध्ये रविवारी विद्युत रोषणाई करण्यात आली. महाशिवरात्री निमित्ताने मंगळवारी शहरातील महादेव मंदिरांमध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त रविवारी सकाळी शहरातील फुलवाला चौक, जुना आग्रारोड, पाचकंदील परिसरात बेलाची पाने विक्रीसाठी विक्रेत्यांनी दुकाने लावली होती. बेलाच्या पानांची विक्री ही २० ते २५ रुपयात १०१ पाने यापद्धतीने सुरू होती. अनेक भाविकांनी बेल खरेदीसाठी येथील विक्रेत्यांकडे गर्दी केली होती. तसेच जुने धुळे, पंचवटी परिसर, पारोळा रोड, गल्ली क्रमांक ५, मिल परिसरातील महादेव मंदिरांमध्ये रंगरंगोटी व मंदिरात स्वच्छता करण्याचे काम सुरू रविवारी सकाळपासूनच सुरू होते.
नागेश्वर महादेव मंदिरात महाआरती
शहरातील गल्ली क्रमांक ५ मधील नागेश्वर महादेव मंदिरात १३ रोजी सायंकाळी सात वाजता महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री नागेश्वर ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
मोगलाईतून निघणार कावड
साक्रीरोडवरील मोगलाई परिसरातील महादेव मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या दिवशी कावड यात्रा काढण्यात येणार आहे. महादेव मंदिर ते सिद्धेश्वर गणपती मंदिरापर्यंत ही कावड काढण्यात येईल. याप्रसंगी येथील महादेव मंदिरात सकाळी अभिषेक व पूजनाचा कार्यक्रम होईल.
शिवध्वजारोहणाचा कार्यक्रम
महाशिवरात्रीच्या निमित्ताने अशोक नगरातील ब्रम्हकुमारीज प्लॉट क्रमांक ३१ येथे शिव ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी आठ वाजता होईल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.
बाळापूर येथे बारा तासांचे अखंड भजन
महाशिवरात्रीनिमित्ताने धुळे तालुक्यातील बाळापूर येथील गुरूदत्त मंदिरात मंगळवारी सकाळी श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या विद्यमाने बारा तासांच्या अखंड भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच याच दिवशी सायंकाळी सहा वाजता २१ ओंकार, वेद पठणही होणार आहे. या कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सत्य साई सेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. सुरेश वाघ व विलास चव्हाण यांनी केले आहे.