शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत विकासकामांच्या मुद्यावर दावे-प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 09:57 PM2017-12-03T21:57:12+5:302017-12-03T22:01:19+5:30

पाणीप्रश्न प्रमुख मुद्दा : रस्ते, गटारी, भाजीमंडई आदी सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे जाहीरनाम्यांमध्ये आश्वासन

Claims and counter-claims on development work | शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत विकासकामांच्या मुद्यावर दावे-प्रतिदावे

शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत विकासकामांच्या मुद्यावर दावे-प्रतिदावे

Next
ठळक मुद्देशिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत शहर विकासाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवरशहरातील जनतेच्या दृष्टीने रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणीप्रश्न असे अनेक गैरसोयीचे मुद्देपाणी प्रश्न सोडविण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे सर्वांचेच म्हणणे 

सुरेश विसपुते । 
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : नगरपंचायत निवडणुकीत शहर विकासाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला असून त्यावरच प्रचार केंद्रित झाला आहे. यंदाची ही निवडणूक या मुद्यावरच लढली जात असून सहभागी पक्षांकडून दावे-प्रतिदाव्यांना सुरुवात झाली आहे.  पाणीप्रश्नाने शहरवासीयांना चांगलेच भेडसावले आहे. त्यामुळे पाणी प्रश्न सोडविण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे सर्वांचेच म्हणणे आहे. या शिवाय रस्ते, भूमिगत गटारी, भाजी मंडईचा प्रश्न या मुद्यांना निवडणुकीतील प्रमुख पक्षांनी आपल्या जाहीरनामा, वचननामा यात स्थान दिले आहे.
विकासाच्या अजेंड्यावर काम
पक्षनेते आणि राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पाणी योजनेला मंजुरी मिळवून देत शहराचा मुख्य प्रश्न मार्गी लावल्याचे भाजपचे अनिल वानखेडे यांचे म्हणणे आहे. आमदार झाल्यानंतर रावल यांनी शहरातील प्रशासकीय इमारत, पोलीस ठाण्याची इमारत, आदिवासी मुलांचे वसतिगृह, आयटीआयसाठी स्वतंत्र इमारत अशी विकासाची कामे केली. येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर त्यांच्या प्रयत्नांनी झाले. आता तर ते मंत्री असल्याने शहरवासीयांच्या अपेक्षा स्वाभाविक उंचावल्या अहेत. स्वच्छ मुबलक पाणी, सांडपाणी निचºयासाठी भूमिगत गटारी, चांगले रस्ते, शहरासाठी सुसज्ज बगिचा, क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करणे, भाजी मंडईसाठी अतिक्रमणधारकांना सामावून घेत प्रशस्त संकुल उभारणी या विकासाच्या बाबी  अजेंड्यावर असून त्यासाठी आमचा पक्ष स्वबळावर लढत आहे, असे ते म्हणाले.  
नगरपंचायतीच्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या ठिकाणी नवीन भव्य इमारतीची उभारणी, ज्यांना घरे नाही, त्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करणे, उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी खासगी तत्त्वावर आयटीआयची उभारणी हेही आम्ही करणार असल्याचे ते म्हणाले.
विकासाची कामे मार्गी 
शहरात विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यात पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लागले असून केवळ जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ व वाहिन्या टाकण्याचे काम बाकी आहे. ते पुढील काळात करणार असल्याचे कॉँग्रेसचे प्रा.सुरेश देसले यांनी सांगितले. भाजी मार्केटच्या कामासाठी कार्यादेश मिळाला असून लवकरच भूमिपूजन करण्यात येईल. शहरात रस्त्यांचे काम झाले. परंतु अनुशेष बाकी आहे. सत्ता मिळाल्यानंतर तेही करणार आहोत. बैठकीत भूमिगत गटारींचा विषय झाला असून त्यासाठी प्रकल्प संचालक नेमणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉलनी एरियात दोन ठिकाणी बाग तयार करण्यासाठी कार्यादेश दिले असून खुले भूखंड (ओपन स्पेस)ही विकसित केले जातील. डी.पी. प्लॅन तयार होत असून त्यात क्रीडा संकुलासाठी सरकारी जागेवर आरक्षण टाकण्यात येईल. नगरपंचायतीसाठी नवी प्रशासकीय इमारत व शहराचा पंतप्रधान योजनेत समावेश झाल्याने सर्व समाजातील गरीब लोकांसाठी त्या माध्यमातून घरकुले दिले जातील, असेही प्रा.देसले यांनी स्पष्ट केले.
शहर अद्याप बकाल
गेल्या अनेक वर्षांपासून कॉँग्रेसची सत्ता आहे. कधी अनिल वानखेडे कधी प्रा.सुरेश देसले यांच्या पॅनलची सत्ता अशी परिस्थिती राहिली. मात्र शहराचा विकास न झाल्याने सध्या अवस्था बकाल अशी आहे. खड्डे, मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, गटारींचा अभाव, नगरपंचायत होऊन पाच वर्षे झाली पण अद्याप नवीन इमारत नाही. जुन्याच इमारतीत काम सुरू आहे. असे अनेक प्रश्न असून ते शिवसेना मार्गी लावणार, असे पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंके म्हणाले. भाजी मंडईचा प्रश्न सुटलेला नाही. कॉँग्रेसचे लोक भाजपमध्ये गेल्याने भाजपची कॉँग्रेस झाली आहे. त्यामुळे जनतेला समर्थ पर्याय वाटल्याने शिवसेनेकडून अपेक्षा वाढल्या आहे. पक्षाची सत्ता आल्यास शहरात भव्य शिवस्मारक उभारू, नगरपंचायतीस भ्रष्टाचारापासून मुक्त करू, पर्यायी जागा देऊन व्यापार संकुलात अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करू, रस्ता, गटारी व भाजी विक्रेत्यांचा प्रश्नही मार्गी लावू. तसेच उत्तमबगिचा, क्रीडा संकुल व नगरपंचायतीसाठी नवी प्रशस्त इमारत उभारू. तसेच वचन पक्षाने दिले असून त्यासाठी स्वबळावर लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  
मूलभूत सुविधांवर भर 
शहरातील जनतेच्या दृष्टीने रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणीप्रश्न असे अनेक गैरसोयीचे मुद्दे आहेत. जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण झाले. ८५ लाख रुपये खर्च झाले. अंतिम बिलेही दिली गेली. मात्र त्यातून अद्याप थेंबभर पाणी मिळालेले नाही, असे समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष व या निवडणुकीतील नगरसेवकपदाचे उमेदवार विजयसिंह राजपूत यांनी सांगितले. प्रथमच नगराध्यक्षपदासह सर्व जागांसाठी उमेदवार देऊन पक्षाने आपली चुणूक दाखविली आहे. शहरवासीयांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. काटेरी बाभळांमुळे डासांचा त्रास होत आहे. पक्षाला सत्ता मिळाल्यास ही सर्व झाडे काढून शहर स्वच्छ करू. रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण झाले; परंतु सांडपाणी वाहून जाण्यास जागा नाही. चेंबर नाही. त्यामुळे निचरा होत नाही. कचेरी चौकात नेहमी सर्वाधिक पाणी तुंबते. २००० सालापासून भाजीमंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. तो मार्गी लावू असेही राजपूत यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Claims and counter-claims on development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.