दोन गटात तुंबळ हाणामारी, परस्पर विरोधी फिर्याद, १९ जणांवर गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: May 14, 2023 07:29 PM2023-05-14T19:29:24+5:302023-05-14T19:29:38+5:30
धुळ्यातील मिलिंद सोसायटीतील घटना.
धुळे: घराचे बांधकाम करीत असताना घराच्या पायऱ्या रोडवर बांधूू नयेत या कारणावरून साक्री रोडवरील मिलिंद सोसायटीत वाद झाले. वादाचे पडसाद दोन गटातील हाणामारीत झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. मध्यरात्री परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने दोन्ही गटांतील १९ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
एका गटाकडून आबा शंकर अहिरे (वय ५०, रा. मिलिंद सोसायटी, कुमारनगर जवळ, साक्री रोड, धुळे) यांनी फिर्याद दाखल केली. अहिरे राहत असलेल्या घरासमोर एका घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करताना घराच्या पायऱ्या रोडवर बांधू नयेत असे अहिरे यांचे बहीण आणि मेहुणे यांनी सांगितले. ते सांगण्याचा राग आल्याने वाद झाला. एक गट एकत्र आल्याने शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने लोखंडी राॅडने मारहाण करून गंभीर जखमी केले. या गोंधळात अहिरे यांची पत्नी मनीषा हिच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत तुटून नुकसान झाले.
दुसऱ्या गटाकडून शोभा प्रवीण लोंढे (३५, मिलिंद सोसायटी, कुमारनगर जवळ, साक्री रोड, धुळे) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, बांधकाम करताना घराच्या पायऱ्या रोडवर बांधू नये या कारणावरून शिवीगाळ करीत हाणामारी झाली. यात लोखंडी रॉडचा सर्रासपणे वापर झाला. शिवीगाळ करण्यात आली. हाताबुक्क्याने मारहाण करण्यात आली. या दोन वेगवेगळ्या फिर्याद शहर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या असल्याने दोन्ही गट मिळून १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.