स्वच्छतेचा ‘डीपीआर’ तयार करणार!

By admin | Published: February 23, 2017 12:24 AM2017-02-23T00:24:25+5:302017-02-23T00:24:25+5:30

महापालिका : सरकारने नेमलेल्या एजन्सीच्या सदस्यांकडून शहर स्वच्छतेची पाहणी

Clean up the DPR! | स्वच्छतेचा ‘डीपीआर’ तयार करणार!

स्वच्छतेचा ‘डीपीआर’ तयार करणार!

Next

धुळे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील १५० शहरांमधील स्वच्छतेची स्थिती तपासून त्या शहरांचा स्वच्छताविषयक ‘डीपीआर’ (डिटेल प्लॅनिंग रिपोर्ट) तयार करून सरकारला सादर केला जाणार असून त्यासाठी केंद्र सरकारने कन्सल्टिंग एजन्सी नेमली आहे़ या एजन्सीचे तीन सदस्य बुधवारी दिल्लीहून धुळ्यात दाखल झाले असून ते स्वच्छतेबाबत आढावा घेऊन शासनाला ‘डीपीआर’ तयार करून देणार आहेत़
शहरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी डिसेंबर महिन्यात राज्य सरकारची समिती धुळ्यात दाखल झाली होती़ या समितीने स्वच्छतेचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले होते़ त्यानंतर महापालिकेने स्वच्छतेसाठी पुरेपूर प्रयत्न केले़ दरम्यान, जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने नेमलेल्या क्यूसीआय समितीनेदेखील शहर स्वच्छतेची पाहणी करून त्याचे जिओटॅग फोटो घेतले होते़  दरम्यान आता तिसºयांदा एक समिती बुधवारी मनपात दाखल झाली़ केंद्र सरकारने देशभरातून निवडलेल्या ५०० शहरांपैकी पहिल्या १५० शहरांच्या स्वच्छतेची स्थिती तपासून व पुढील २५ वर्षांची गरज लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम इकोप्रो एनव्हायर्नमेंटल सिस्टिम या कंपनीला दिले आहे़ या कंपनीचे तीन सदस्य स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आले असून त्यांनी शहरातील स्वच्छता, स्वच्छतेसाठी आवश्यक कर्मचारी संख्या, उपलब्ध घंटागाड्या, कचरा डेपो, सध्या असलेली कर्मचारी संख्या, किती कचरा दररोज संकलित होतो, त्यावर काय प्रक्रिया होते, त्यासाठी येणारा खर्च याबाबत माहिती घेतली़ हिरे वैद्यकीय महाविद्यालय, कॉटन मार्केट, गांडूळ खत प्रकल्प, हॉटेल्स, संभाजी गार्डन या स्थळांची पाहणी करून एजन्सीचे प्रतिनिधी सायंकाळी शिरपूरकडे रवाना झाले़ केंद्र व राज्य सरकारला संबंधित समितीने डीपीआर सादर केल्यानंतर सरकारकडून स्वच्छतेबाबत सुचविण्यात आलेल्या उपाययोजना करण्यासाठी निधी दिला जाणार आहे़ एजन्सीच्या सदस्यांनी सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांच्याशी चर्चा केली़ त्यानंतर नवरंग पाण्याच्या टाकीजवळील स्वच्छता विभागालादेखील समिती सदस्यांनी भेट दिली़  शहर स्वच्छतेसाठी मनपातर्फे प्रयत्न सुरू असले तरी ठोस उपाययोजना करण्यासाठी मनपाकडे निधी उपलब्ध नाही़ बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत असलेल्या महापालिकेला स्वच्छताप्रश्नी बळ देण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे़ गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडून स्वच्छताविषयक उपक्रमांवर भर देण्यासाठी वेळोवेळी सुचित करण्यात येत असल्याने स्वच्छतेसाठी प्रयत्न होत आहेत़ नाशिक विभागातून १० शहरांची निवड करण्यात आली असून त्यात शिरपूर, दोंडाईच्यासह अन्य शहरांचा समावेश असून त्या ठिकाणी एजन्सीचे सदस्य पाहणी करणार आहेत़

सदर समितीत श्रद्धा तोमर, निघत गनी व अभिजित जैन या तीन सदस्यांचा समावेश आहे़ कचरा व्यवस्थापनासाठी माहिती संकलन करावयाची असून स्वच्छतेचा आढावा घेत आहोत़ कचरा व्यवस्थापनासाठी लोकसंख्या, कचरा निर्मिती व व्यवस्थापन यासाठी नेमलेल्या एजन्सीमार्फत धुळे शहराची पाहणी करण्यात येत असल्याचे समिती सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

Web Title: Clean up the DPR!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.