धुळे जिल्ह्यात २६ पासून स्वच्छतेचा जागर अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:39 AM2019-01-16T11:39:16+5:302019-01-16T11:40:27+5:30
स्वच्छ भारत मिशन : प्रवचनकार जिल्ह्यातील ६७२ महसुली गावांमध्ये जनजागृती करणार
आॅनलाइन लोकमत
धुळे : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि महाराष्टÑ राज्य वारकरी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेच्या जाणिव जागृतीसाठी जिल्ह्यात २६ जानेवारीपासून स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाºया या जागरात जिल्ह्यातील प्रवचनकार ६७२ महसुली गावांमध्ये प्रवचन करणार आहेत.
संपूर्ण राज्यात स्वच्छतेचा जागर हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी वारकरी साहित्य परिषदेचे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्याचा दौरा करीत आहे.
त्याअंतर्गत मंगळवारी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात पूर्वतयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. होते. व्यासपीठावर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल होते.
बैठकीत प्रवचनकार महाराजांच्या प्रबोधनासाठी शाश्वत स्वच्छता, वैय्यक्तिक स्वच्छता, स्वच्छता सुविधांची देखभाल, दुरूस्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, ग्रामीण कुटुंबाना शौचालय नियमित वापरण्याची सवय, प्लॅस्टिक बंदी आणि प्लॅस्टिकचे धोके, परिसर स्वच्छतेचे महत्व या विषयावर प्रबोधन होण्यासाठी संबंधित विषयाचे टिपण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या विषयाचा समावेश प्रवचनकार आपल्या प्रवचनात करणार आहे.
या बैठकीला जिल्ह्ययातील ४० प्रवचनकार उपस्थित होते. मधुकर वाघ यांनी प्रास्ताविकेतून अभियानाची माहिती दिली. सूत्रसंचालन विजय हेलिंगराव यांनी केले. पसायदानाने बैठकीची सांगता झाली.