भामेर किल्ला परिसरात राबविली स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:04 PM2020-01-30T12:04:56+5:302020-01-30T12:05:55+5:30
शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे होतेय कौतुक, परिसरात जागोजागी केली स्वच्छता
आॅनलाइन लोकमत
धुळे -आपल्या ऐतिहासिक वास्तुचे जतन केले पाहिजे, स्वच्छतेसोबतच त्यांचे संवर्धन देखील करावे या उद्देशाने साक्री तालुक्यात असणाऱ्या भामेर किल्यावर शिवदुर्ग प्रतिष्ठानतर्फे श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत किल्याच्या मार्गावरील काटेरी झुडपे तसेच किल्याचाच भाग असणारा गावाच्या प्रवेशद्वाराजवळील कमानीच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली.
एकेकाळी अहिर राजाची राजधानी असणारे भामेर हे सुरत-बºहाणपूर मार्गावरील वैभवशाली व समृद्ध शहर म्हणून परिचित होते. या ठिकाणी पाच डोंगरी किल्ल्यांमध्ये सुमारे २५०० फुट उंचीवर हा भामेर किल्ला आहे. या भामेर किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात गुफा व पाण्याचे टाकी आहेत. तसेच या ठिकाणी कोरीव लेण्या देखील आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षात याकडे दुर्लक्ष झाल्याने या गुफांमध्ये, लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता.झाली आहे. यावास्तुकडे दुर्लक्ष झाल्याने हा ऐतिहासिक किल्ला लोकांसमोर येवू शकलेला नाही. अशावेळी हा वैभवशाली वारसा सर्वासमोर आणण्यासाठी साक्री येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानकडून पुढाकार घेण्यात आला. या किल्याच्या स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेत शिवदुर्गच्या सदस्यांसह सुमारे ५० हून अधिक दुर्गप्रेमी व भामेर गावातील तरुण सहभागी झाले होते. या मोहिमेत किल्ल्यावर जाणाºया मार्गांवरील काटेरी झाडीझुडपे काढण्यात आली. तसेच किल्ल्यावर असणाºया एका टाक्याजवळ स्वच्छता करण्यात आली. किल्ल्यावर चढून गेल्यानंतर सर्वात वरच्या भागात मोठा भगवा ध्वज देखील लावण्यात आला. तद्नंतर किल्ल्याच्या पायथ्याशी व गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असणाºया कमानीचा परिसर, याच ठिकाणी असणाºया वीरगळीचा परिसर देखील स्वच्छ करण्यात आला.