क्लिप व्हायरलप्रकरणी दोघांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:29 PM2018-11-28T22:29:59+5:302018-11-28T22:30:29+5:30
संयुक्त कारवाई : आमदार हत्येचा होता कट
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आमदार अनिल गोटे यांच्या हत्येच्या कटाविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लीप प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि मोहाडी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने तपासाची चक्रे फिरवून दोन जणांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे़ त्या दोघांना देवपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़
मंगळवारी दोन जणांचे मोबाईलवरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते़ अवधान येथील सभेत आमदार अनिल गोटे यांच्यावर गोळी झाडणार होतो, पण डॉक्टरने मला अडविले़, असा प्रकारचा संवाद क्लीपमध्ये होता़ त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती़ याप्रकरणी आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष हेमा गोटे यांनी शिष्टमंडळासह पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली़ संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती़
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या संयुक्त पथकाने तपास केला. आणि अखेर गणेश रघुनाथ वाडेकर (रा़ मोहाडी) आणि तौफिक शेख (रा़ जामचा मळा) या दोघा संशयितांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.