जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बंद घरे फोडली
By देवेंद्र पाठक | Published: December 14, 2023 06:55 PM2023-12-14T18:55:53+5:302023-12-14T18:56:09+5:30
पावणे दोन लाखांचा ऐवज लांबविला, पोलिसात गुन्हा.
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील मंदाणे आणि शिरपूर येथे बंद घराचा फायदा उचलत चोरट्याने हातसफाई केली. सुमारे पावणे दोन लाखांचा ऐवज शिताफीने लांबविला. ही घटना बुधवारी पहाटे घडली असून दुपारी दोंडाईचा आणि शिरपूर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मंदाने येथील घटना
शिंदखेडा तालुक्यातील मंदाने येथील भबुता संपत माळी (वय ८०) या वृद्धेने दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भबुता माळी या घर बंद करून बाहेरगावी गेलेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्याने घराला लावलेले कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान करत शोधाशोध सुरू केली. १४ हजार ३५० रुपये किमतीचे चांदीचे दागिने, १५ हजार रुपये रोख असा २९ हजार ३५० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. चोरीची ही घटना ५ डिसेंबर रोजी रात्री १० ते ६ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. त्यात यश न आल्याने बुधवारी दुपारी सव्वा चार वाजता भादंवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक अभय गवते घटनेचा तपास करीत आहेत.
शिरपूर येथील घटना
मोहनसिंग जालसिंग परदेशी (वय ५९, रा. शिवप्रसाद पार्क, करवंद शिवार, शिरपूर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मोहनसिंग परदेशी हे परिवारासाेबत बाहेरगावी गेलेले होते. घर बंद असल्याची संधी चोरट्याने साधली. घराला लावलेले कुलूप कशाच्यातरी साहाय्याने तोडून आतमध्ये प्रवेश करण्यात आला. घरातील संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान करत शोधाशोध सुरू केली. चोरट्याने कपाट फोडून १२ हजार रोख रकमेसह दागिने असा एकूण एक लाख ४६ हजारांचा ऐवज शिताफीने लांबविण्यात आला. चोरीची ही घटना ९ डिसेंबर राेजी दुपारी तीन ते १३ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. परदेशी परिवार घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी बुधवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक हेमंत खैरनार करीत आहेत.