धुळे जिल्ह्यात सालटेक, पेरेजपूरला ढगफुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:07 PM2018-06-24T22:07:09+5:302018-06-24T22:09:53+5:30
प्रशासनाचा नकार, शेती, कांदा व विहिरींचे प्रचंड नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील सालटेक, पेरेजपूर परिसरात रविवारी दुपारी झालेल्या ढगफुटीच्या घटनेने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने कांदा चाळींसह शेतपिके व विहिरींचा समावेश आहे. प्रशासनाने ढगफुटी झाली यास दुजोरा दिलेला नाही. मात्र ढगफुटीत होणारा कमी वेळेत जास्त पाऊस येथे झाला आहे. दुपारी तासाभरात सलग हा पाऊस झाला.
या संदर्भात हवामानशास्त्र विभागाने इशारा दिलेला होता. त्यात गुजरात राज्यास लागून असलेल्या परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली होती. प्रशासनालाही याबाबत माहिती होती. परंतु त्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी अतिवृष्टी होईल, याचा उल्लेख केलेला नव्हता, अशी माहिती साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यांनी ढगफुटी नाही; पण त्यासदृश्य हा पाऊस असल्याचेही सांगितले.
कांदा चाळी उदध्वस्त; परिसरातील विहिरी बुजल्या
रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. सलग परंतु संथ स्वरुपात हा पाऊस बरसला. तासाभरात अतिवृष्टी झाल्याने सालटेक, पेरेजपूर परिसरात असंख्य कांदाचाळींची दाणादाण उडाली. कांदे पाण्याने भिजले असून सडण्याची शक्यता आहे. तर पडणाºया पावसाचे पाणी वाट फुटेल, त्या बाजूला वाहिल्याने नाल्यासह कान नदीला मोठा पूर आला. तसेच शेतांमधूनही पाणी वाहिल्याने जमिनीवरील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. शेतविहिरींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक विहिरी बुजल्या गेल्या असून ऐन खरिपाच्या हंगामात शेतक-यांच्या पुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
पंचनाम्याच्या आदेशाने दिलासा
ढगफुटीच्या घटनेबाबत कळताच तालुक्याचे तहसीलदार संदीप भोसले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संपूर्ण परिसरात पाहणी केली. शेतकरी, ग्रामस्थांशीही संवाद साधला. कमी वेळेत जास्त पाऊस बरसून नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. सोमवारीही तहसीलदार भोसले कर्मचा-यांसह त्या परिसरात जाणार असून नुकसानाचा अंदाज घेणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन वर्षांपूर्वीही झाला होता असाच पाऊस
सालटेक, पेरेजपूर ही गावे एकमेकांच्या जवळ आहेत. पेरेजपूर खाली तर या गावाजवळ असलेल्या टेकडीच्या वर सालटेक वसले आहे. दोन वर्षांपूर्वीही याच ठिंकाणी असाच ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. दोन वर्षांनंतर या घटनेची पुनरावृत्ती झाली. दोन वर्षांपूर्वी तालुक्यात कुठेही पाऊस होत नव्हता. परंतु या ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. दोन वर्षांपूर्वी घटबारी धरण फुटले होते, त्यास कारणही तोच पाऊस होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या परिसराचे भौगोलिक स्थान वैशिष्टपूर्ण असून त्यामुळेचा असा ढगफुटीसारखा पाऊस होत असल्याची चर्चा आहे.